जिल्हा परिषद आवारात झाडावर चढून आंदोलन
भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईची केली होती मागणी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-03 13:06:17
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : नांदगाव तालुक्यातील गिरणानगर ग्रामंपचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ग्रामसेविका आणि सरपंच यांच्याविरोधात कारवाईची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. या दोघांनाही तत्काळ बडतर्फ करावे, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य तथा माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील सोनवणे यांनी सोमवारी (दि. २) दुपारी जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील झाडावर सुमारे २५ फूट उंच चढून शोले स्टाईल आंदोलन केले. भद्रकाली पोलिसांनी अर्ध्या तासाच्या शिकस्तानंतर अग्निशमन दलाच्या शिडीद्वारे आंदोलक सोनवणे यांना झाडावरूऩ खाली उतरविले. पोलिसांनी सोनवणे यांना समज देऊन सोडून दिले.
गिरणानगर ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीररित्या ५० वर्षीय नितीन नथू गोफणे आणि बाभूळवाडी ग्रामपंचायतीमध्ये ४० वर्षीय आनंदा भसरे यांना बेकायदेशीररित्या भरती करण्यात आले आहे. गिरणानगर ग्रामपंचायतीचे कर्मचारी जयराम आहेर यांनी पगाराव्यतिरिक्त बेकायदेशीररित्या पैसे काढून भ्रष्टाचार केला असून, ग्रामसेविकेने शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता हडपल्याचा आरोप आंदोलक ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद प्रशासनाला वेळोवेळी दिले. परंतु कार्यवाही झाली नसल्याचे सोनवणे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातदेखील पत्र दिल्याचे सांगितले. निवडणुकीच्या कामांमुळे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. शेवटी नाइलाजास्तव जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोनवणे यांनी झाडावर चढून सत्याग्रह आंदोनल सुरू केल्याचे सांगितले. आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या शिडीला पाचारण केले. अर्ध्या तासाच्या कसरतीनंतर सोनवणे यांना झाडावरून उतरविण्यात आले.
तथ्य आढळल्यास कारवाई
आंदोलक सुनील सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारे संपर्क केला नाही. जिल्ह परिषदेत आल्यानंतर त्यांनी अचानक झाडावर चढून प्रशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर तत्काळ योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. मात्र, त्यांनी अशाप्रकारे स्वत:च्या जीविताला धोका निर्माण करायला नको. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कारवाई आवश्यक आहे.- -प्रशांत पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रा.पं. विभाग