गृहखातं जेवढे चांगले तेवढेच अडचणीचे
छगन भुजबळांचा एकनाथ शिंदेंना टोला
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-03 13:15:42
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : गृहखात जवळ असलं की, पोलीस येता-जाता सॅल्यूट ठोकतात. पण कुठे दंगल, बलात्कार, खून झाला की, जणू गृहमंत्र्यानेच केला, असे प्रश्न विचारले जातात, असे सांगत गृह खातं जेवढं चांगल, तेवढं ते अडचणीचही ठरतं, याची आठवण करून देत महायुतीत गृह खात्यावरून सुरू असलेल्या वादावर छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला टोला लगावला.
भुजबळ फार्म येथील कार्यालयात पत्रकारांसोबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या गृहमंत्रिपदाच्या काळातील आठवणी सांगितल्या. मी गृहमंत्री झालो, तेव्हा राज्यात गॅंगवार शिगेला पोचले होते. दररोज खून, हल्ले व्हायचे. मोठे लोक मुंबईऐवजी अहमदाबाद अथवा बंगळुरूला लग्नसोहळे करायचे. व्यापार्यांनी तर काळी दिवाळी साजरी केली होती. मात्र, आम्ही पोलिसांच्या मदतीने गॅंगवाॅर संपुष्टात आणले. त्यामुळे गृहमंत्रिपद अडचणीचेही ठरते याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवार सोबत नसते तर आमच्या शंभर जागा आल्या असत्या, असे विधान केले आहे, त्याबाबत विचारले असता, शिंदे गट सोबत नसता तर आमचेही शंभर निवडून आले असते, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात भाजप मोठा पक्ष असून, मुख्यमंत्री त्यांचाच होणार हे स्पष्ट करत ते कोणाला मुख्यमंत्री करतील हे मी कसे सांगू?, असे ते म्हणाले.