शपथविधीची तयारी; मुख्यमंत्री ठरेना!
एकोणीस मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंना निमंत्रण, तीन व्यासपीठे उभारली
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-04 12:08:58
मुंबई : विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविणाऱ्या महायुतीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी केली जात असताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मात्र जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह १९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनाही निमंत्रित केले जाईल. १९ राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह केंद्रातील पाच मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
महायुती सरकारचा शपथविधी तोंडावर आला असतानाच शिवसेना शिंदे गटाने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. शिंदेंचे शिलेदार उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांवर चर्चा केल्याचे समजते. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यात स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासह संजय राठोड व इतर पाच नेत्यांची नावे आहेत. मुख्यमंत्रिपद भाजपला गेल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाला गृहमंत्रिपद मिळावे, अशी मागणी करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, एकनाथ शिंदे आजारी असल्याने महायुतीची बैठक होऊ शकली नव्हती. त्यामुळे कुणाला किती मंत्रिपदे, याची निश्चिती होत नव्हती. आता शिवसेना शिंदे गटाकडून हालचाली सुरू असून, सामंत यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यात गुरुवारी (दि. ५) होणाऱ्या शपथविधीच्या तयारीवर चर्चा झाली. या बैठकीत सामंत यांनी शिवसेनेचा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवल्याचे समजते. २३ नोव्हेंबरनंतर शिवसेना नेते व फडणवीस यांच्याच झालेली ही पहिलीच बैठक आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठीचा भव्यदिव्य मंच व जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर ५ डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता शपथविधी पार पडेल. या सोहळ्यासाठी साधारणतः ३० ते ४० हजार लोक अपेक्षित आहेत. त्याअनुषंगाने आझाद मैदानात तीन व्यासपीठे असणार आहेत. मुख्य व्यासपीठ ६० बाय १०० बाय आठ फूट असेल. या मंचावर पंतप्रधान व इतर राज्यांचे मुख्यमंत्री असतील. उजव्या बाजूला ८० बाय ५० बाय सात फूट लांबीचा मंच असेल. यावर सर्व साधू-संत बसतील. डाव्या बाजूला ८० बाय ५० बाय सात फुटांचे व्यासपीठ असेल. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असेल. साउंड सिस्टिम या ठिकाणी राहील. मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खासदार, आमदारांची बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी चारशे खुर्च्या असतील. बाजूला व मुख्य व्यासपीठासमोर व्हीव्हीआयपींची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास एक हजार खुर्च्या याठिकाणी असतील. डाव्या बाजूला महायुतीमधील मुख्य पदाधिकाऱ्यांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांसाठी सात विभागांत बसण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण व्यासपीठाच्या बाजूला सहा बाय सोळा उंचीचे कटआउट लावले जातील. कार्यकर्त्यांसाठी तीन प्रवेशद्वार असतील. मुंबई महापालिकेसमोर हे प्रवेशद्वार असेल. व्हीआयपींसाठी तीन प्रवेशद्वार असतील. फॅशन स्ट्रीटकडून व्हीआयपींना प्रवेश दिला जाईल. या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातील एक 'चहावाला' विशेष उपस्थित राहणार आहे. नागपूरमध्ये चहाचा स्टॉल चालवणारे गोपाल बावनकुळे हे फडणवीस यांचे मोठे चाहते आहेत. शहरातील रामनगर परिसरात अनेक वर्षांपासून त्यांचा चहाचा स्टॉल आहे. या चहाच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही आहे.
खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला?
महायुती सरकारच्या खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आता समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागांवर विजय मिळवल्याने सरकारमध्ये त्यांच्याकडे २१ ते २२ मंत्रिपदे असणार आहेत. गृहमंत्रिपद विधानसभा अध्यक्षपददेखील भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. उर्वरित मंत्रिपदांवर शपथविधीनंतर चर्चा होणार आहे. अजित पवार गटाला अर्थमंत्रिपद जाण्याची शक्यता आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास मंत्रिपद मिळू शकते. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या ११ ते १२ आमदारांना, तर अजित पवार गटाच्या १० आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
‘एक है, तो सेफ है’चा नारा दिसणार
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला होता. शपथविधीतही ‘एक है, तो सेफ है’चा नारा दिसेल. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात दहा हजार भाजप कार्यकर्ते एक है, तो सेफ है, अशा आशयाचे मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करणार आहेत. शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीलाकाळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून आजारी आहेत. त्यांनी रुग्णालयात उपचारही घेतले. त्यानंतर शिंदे वर्षा या शासकीय निवासस्थानी आले असता, भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन शिंदेंची भेट घेतली. या भेटीत शिंदे व फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
शिवसेने(शिंदे गट)च्या संभाव्य मंत्र्यांची नावे
कनाथ शिंदे, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड, उदय सामंत.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे
भाजपकडून सोळा जणांना मंत्रिपदाची शपथ मिळू शकते. यात रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांचे मंत्रिपद कायम राहणार आहे. नितेश राणे, गणेश नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.