मुख्यमंत्रीपदी फडणवीसच पुन्हा येणार !

भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत चित्र स्पष्ठ

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-04 12:23:37

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र आता फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होणार, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार आज (दि.४ डिसेंबर ) दुपारी साडे तीन वाजता सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यासाठी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे तिघेही राज्यपालांची भेट घेतील. त्यानंतर या भेटीत राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना पत्र दिले जाईल. त्यानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया चालू होईल. 

 आज (दि.४ डिसेंबर ) सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भाजपाचे नेते विजय रूपानी हे केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. त्यांच्या उपस्थित विधानभवनात भाजपाच्या कोअर कमिटीची  बैठक झाली. या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव एकमताने ठरवण्यात आले. या बैठकीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. 

   ही बैठक संपल्यानंतर विधानसभवनातच भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे सर्व १३२ आमदार उपस्थित होते. तसेच भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही या बैठकीत समावेश होता. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. यासह प्रवीण दरेकर यांनीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.  मेघना बोर्डीकर यांनीदेखील फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. योगेश सागर यांनीदेखील भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदासाठी फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. फडणवीसांच्या नावाला कोणीही विरोध न केल्यामुळे त्यांची भाजपाच्या गटनेतेपदी    देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर   शिक्कामोर्तब झाले.