मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान नाहीच
प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत जाणार- जानकर
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-04 12:33:19
सोलापूर : बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू, असा निर्धार व्यक्त करत मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी मारकडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमव सुरू झाली होती. मात्र, पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून येथील बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मारकवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मारकडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान प्रक्रिया राबवण्यावर ठाम होते. आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, तुम्ही एक मतदान केले, तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू. आम्ही अगोदरच १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी जानकर यांना सांगितले. यानंतर आपण ग्रामस्थांसोबत चर्चा केली. पोलीस मतदान करू देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरून ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील, असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले. त्यामुळे तूर्तास आम्ही ही मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे जानकर यांनी सांगितले. आता आम्ही मोर्चा काढून हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू. पण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, असे जानकर यांनी सांगितले. माझ्या अभ्यासानुसार मला या गावात १४०० आणि समोरच्याला ५०२ इतकी मते पडली. पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मारकडवाडीतून १००३ मते पडली आहेत. समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झाले, असा आरोप जानकर यांनी केला.