शिंदेंच्या पाठीशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती
नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचा संवाद
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-04 12:43:06
मुंबई : महायुतीमध्ये सत्तास्थापनेचा जो तिढा सुरू आहे, या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मंगळवारी मुंबईत ‘मातोश्री’वर बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस फक्त पत्रके वाटाण्यापुरती होती. सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजपचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन महाराष्ट्रात काम करतात, त्या पद्धतीनेच आपण आता काम केले पाहिजे. शिवसैनिकांनी तळागाळात जाऊन कामालालागले पाहिजे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढली, आजही लढत आहे, उद्याही लढेल आणि पुढेही लढतच राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य ते उत्तर द्या, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर आयोजित केले जाणार आहे.