नोकरीच्या आमिषाने ४४.५० लाखांची फसवणूक
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-04 12:57:34
लोकनामा प्रतिनिधी
मालेगाव ः बागलाण तालुक्यातील सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने दोघांची ४४ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नरेंद्र निंबा भामरे (रा. लखमापूर, ता. बागलाण) या शेतकऱ्याने प्रतीक मदन पाठक (रा. सटाणा, ता. बागलाण) यांच्याविरुद्ध सटाणा पोलिसांत तक्रार दिली आहे.
संशयित पाठक यांनी भामरे व त्यांच्याबरोबर एक, अशा दोघांना तुमच्या पाल्यांना नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. त्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांनी ७ फेब्रुवारी ते ५ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ऑनलाइन, तसेच सटाणा बाजार समितीत ४९ लाख ५० हजार रुपये घेतले होते. त्यांपैकी पाठक यांचे चुलते मधुसूदन पाठक यांनी यातील एकाला पाच लाख रुपये परत दिले. मात्र, उर्वरित ४४ लाख ५० हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.