सिगारेट, तंबाखू, कोल्ड ड्रिंक महागणार
जीएसटी स्लॅब ३५ टक्क्यांवर जाणार?
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-04 13:07:03
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटीच्या परिषदेची बैठक २१ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
यात कोल्ड ड्रिंक, सिगारेट ते तंबाखू यांसारख्या पदार्थांवरील जीएसटी वाढवला जाण्याची शक्यता आहे. या पदार्थांवर सध्या २८ टक्के लागू आहे. त्यात ३५ टक्क्यांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. सूत्रांनुसार, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने कोल्ड ड्रिंक, तंबाखू व सिगारेटवरील जीएसटीमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला तर्कसंगत असल्याचे म्हटले आहे. मंत्रिगटाच्या बैठकीत झालेल्या निर्णयांवर जीएसटी परिषदेत अंतिम निर्णय घेतला जाईल. मंत्री गटाकडून एकूण १४८ वस्तूंवरील कर बदलण्याचा प्रस्ताव दिला जाईल. मंत्रिगटाने तंबाखू, तंबाखूजन्य उत्पादने व कोल्ड ड्रिंक्सवर ३५ टक्के कर लावण्याच्या प्रस्तावावर सहमती दर्शवली.अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ५, १२, १८ व २८ असे चार स्लॅब सध्या आहेत. मंत्रिगटाच्या प्रस्तावानुसार ३५ टक्क्यांचा स्लॅब येऊ शकतो. मंत्रिगटाने १५०० रुपयांपर्यंतच्या तयार कपड्यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. १५०० ते १०,००० हजारांच्या पर्यंतच्या कपड्यावर १८ टक्के, तर २८ टक्के जीएसटी दहा हजारांपेक्षा अधिक किमतीच्या कपड्यांवर लावला जाण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत आरोग्यविमा आणि जीवन विमा यांच्यावरील जीएसटीच्या स्लॅबमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. मंत्री परिषदेच्या बैठकीत दर कमी झाल्यास विम्यासाठी करावा लागणारा खर्च कमी होऊ शकतो.