बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनल्सवर बंदीची मागणी
प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-04 13:15:10
ढाका : बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
बांगलादेशी संस्कृती व समाजावर भारतीय प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढत असल्याचा दावा करत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतची याचिका वकील इखलास उद्दीन भुईयाँ यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन अॅक्ट २००६ अंतर्गत भारतीय टीव्ही चॅनलच्या प्रसारणावर बंदी घालण्यासाठी निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत स्टार जलशा, स्टार प्लस, झी बांगला, रिपब्लिक बांगला आणि इतर सर्व भारतीय टीव्ही चॅनलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीय टीव्ही चॅनलच्या माध्यमातून प्रक्षोभक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांगलादेशी संस्कृतीला विरोध करणाऱ्या मजकुराचे अनियंत्रित प्रसारण होत असल्याने त्याचा परिणाम तरुणांवर होत असल्याचे म्हटले आहे. या वाहिन्या कोणतेही नियम न पाळता चालवल्या जात आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
बांगलादेशात शांतिसेना पाठवावी : ममता
बांगलादेशातील सध्याच्या घडामोडी पाहता, केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे (यूएन) बांगलादेशात शांतिसेना तैनात करण्याची विनंती करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडींवर भारताची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत मांडावी. बांगलादेशातून भारतात येणाऱ्या अनेकांना अटक झालेल्या घटनांनंतर, येथील ‘इस्कॉन’च्या प्रतिनिधींशी बोलल्यानंतर, मला विधानसभेत यावर बोलणे भाग पडले आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या.