बादल यांना शौचालय साफ करण्याची शिक्षा

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-04 14:04:11

चंडीगड: पंजाबमधील शिरोमणी अकाली दला(एसएडी)चे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यावर गंभीर आरोप करत ‘अकाल तख्त’चे जथेदार ग्यानी रघबीरसिंग यांनी बादल व इतर वरिष्ठ नेत्यांना ‘तनखा’ (धार्मिक शिक्षा) ठोठावली. या शिक्षेचा एक भाग म्हणून बादल व २०१५ पासून राज्यातील मंत्र्यांसह अकाली दलाच्या कोअर कमिटी सदस्यांना शौचालये स्वच्छ करणे, लंगरमध्ये सेवा करणे, नितनेम (दररोज शीख प्रार्थना) करणे व सुखमनी साहिबचे पठण करण्याचे आदेश दिले आहेत.
      दरम्यान, दिवंगत माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना देण्यात आलेली ‘फखर-ए-कौम’ (राष्ट्राची शान) ही पदवीही जथेदारांनी रद्द केली. 
जथेदारांनी पक्षाच्या कार्यसमितीला बादल यांचा राजीनामा स्वीकारण्याचे निर्देश दिले. सदस्यत्व मोहीम सुरू करण्यासाठी व नवीन नेतृत्व निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी समिती स्थापण्याची घोषणाही केली. सुवर्ण मंदिरातील शिखांचे सर्वोच्च आसन असलेल्या ‘अकाल तख्त साहिब’ येथे याबाबतची कार्यवाही पार पडली.  दरम्यान, आरोग्याच्या तक्रारींमुळे सुखबीर बादल व सुखदेवसिंग धिंडसा यांना गुरूंच्या निवासस्थानी दोन दिवस द्वारपाल म्हणून काम करण्यास, पारंपरिक सेवक पोशाख घालून भाले धारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित रण रहीमला माफी देणारे माजी जथेदार ग्यानी गुरबचन सिंग यांना सार्वजनिक कार्यक्रमांत बोलण्यापासून प्रतिबंधित करून त्यांना प्रदान केलेल्या सर्व सुविधा मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना देण्यात आलेली ‘फखर-ए-कौम’ ही पदवीही जथेदारांनी रद्द केली.