बॉलीवूडचा पहिला स्टायलिस्ट आयकॉन ‘देव आनंद’

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-04 14:59:55

हिंदी चित्रपसृष्टीतील बॉलीवूडचा पहिला स्टायलिस्ट हीरो देव आनंद, हा एक उत्तम अभिनेता, निर्माता व भारतीय सिनेमांचा दिग्दर्शक होता. तो त्याच्या लांबलचक संवाद विना पाॅझ फेकण्याची अद्वितीय अभिनय शैली, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि रोमँटिक प्रतिमेसाठी ओळखला जात असे. १९५० ते १९७० च्या दशकात त्याने अनेक हिट चित्रपट दिले. हिंदी सिनेमाच्या त्या सुवर्ण युगातील तो अग्रगण्य स्टारच होता.
        सन १९४६ मध्ये त्याने 'हम एक है' या चित्रपटात पदार्पण करून करिअरची सुरुवात केली. नंतर देव आनंदने १९४९ मध्ये नवकेतन फिल्म प्रॉडक्शनची स्थापना केली. ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर गेली अनेक दशके त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला, आशा पारेख, नूतन अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्याने अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाइड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस, हे आणि असे अनेक क्लासिक चित्रपट त्याने बनवले व ते गाजले. देव आनंदची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखो रूठाना करो, दिल का भवर करे पूकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल, अशी अनेक त्याच्यावर चित्रित गाणी प्रचंड गाजली. बहुतेक गाणी किशोर कुमार यांच्या आवाजातील व संगीतकार एस. डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केलेली असायची.
             संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्याच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यामुळे उठून दिसणाऱ्या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई. काला पानी, गाइडसाठी फिल्मफेअर बेस्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. सन १९९१ ला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव झाला. देव आनंद हा हीरो त्याच्या आजीवन उत्साह आणि सकारात्मकतेसाठी लक्षात ठेवला जातो. त्याची शैली आणि आकर्षण अद्याप लोकांच्या अंतःकरणात आहे. 
          भारतीय सिनेमात देव आनंदचे योगदान अमूल्य आहे. सिनेमावरील त्याची आवड आणि प्रेम प्रेरणादायक आहे. त्याने स्वीकारलेली उत्स्फूर्त आणि सकारात्मक जीवनशैली अजूनही लोकांसाठी आदर्श आहे. देव आनंद एक कलाकार, निर्माता व दिग्दर्शक म्हणून अद्वितीय होता. त्याच्या चित्रपटांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजालाही दिशा दिली. त्याचे जीवन शिकवते की, प्रत्येक आव्हानावर उत्कटतेने, कठोर परिश्रम आणि सकारात्मकतेमुळे मात केली जाऊ शकते. सिनेमा जग आणि प्रेक्षक त्याचे योगदान कधीही विसरणार नाहीत. गाइडसारख्या चित्रपटात त्याचा प्रायोगिक दृष्टिकोन दिसून येतो. हा चित्रपट भारतीय सिनेमासाठी एक मैलाचा दगड ठरला आणि त्यातील त्याचे 'राजू गाइड' हे पात्र व त्यातील उत्तरार्धात साधू बनलेल्या देव आनंदचे एकाच श्वासात लांबलचक संवाद अद्याप सर्वोत्कृष्ट अभिनयाचे उदाहरण मानले जाते. ना सुख है, ना दुःख है, ना दीन है, ना दुनिया, ना इन्सान, ना भगवान... सिर्फ मैं हूँ, मैं हूँ, मैं हूँ, मैं....सिर्फ मैं...लगता है आज हर इच्छा पूरी होगी, पर मज़ा देखो, आज कोई इच्छा ही नहीं रही जिस जगह को देख कर परमात्मा की याद आये, वो तीर्थ कहलाता है और जिस आदमी के दर्शन से परमात्मा में भक्ति जागे, वो महात्मा कहलाता है ...मौत एक ख्याल है जैसे ज़िन्दगी एक ख्याल है... जो आदमी अपने नसीब को कोसता रहता है, उसका नसीब भी उसको कोसने लगता है... काम उसका, नाम तेरा... मुसीबत और ज़िन्दगी का कहते है चिता तक का साथ रहता है.. याद में नशा करता हूँ और नशे में याद करता हूँ... इन लोगों को मुझपे विश्वास है और अब मुझे इनके विश्वास पे विश्वास होने लगा है…मैं ज़ुबान से लफ़्ज़ों की तस्वीर खींचता हूँ, अतीत तो सब दिखाते है, मैं कभी कभी भविष्य भी दिखाता हूँ.... 

     देव आनंदची फॅशन आणि संवादशैली इतकी प्रभावी होती की, बंद गळ्याचा शर्ट, गळ्यात रुमाल, काळा कोट घालून त्याची चालण्यातील लकब त्या काळातील तरुण पिढीसाठी एक ट्रेंड बनली. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्याला एव्हरग्रीन स्टारचा दर्जा मिळाला.
एकदा देव आनंद त्याच्या बालपणात अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ खसचे शरबत पित होता. एका सरबतवाल्याने त्याला म्हटले 'आपल्या कपाळावर एक मोठा सूर्य आहे आणि आपण एक मोठा माणूस व्हाल.' आणि त्या सरबतवाल्याची भविष्यवाणी पुढे खरी  झाली. मुलगा मोठा झाला आणि एक मोठा स्टार बनला. जो त्या काळाच्या पुढे जाऊन कालातीत ठरला. गर्दन वाकवत चालणे, त्याची टोपी, मानेभोवती रंगीबेरंगी स्कार्फ आणि पाॅझविना बोलण्याची पद्धत, बरेच लोक या शैलीला दाद देत ​​होते. देवसाहेब त्यांच्या फॅशन शैलीबद्दल मोठ्या मनाने आपले मत व्यक्त करीत असे.
खरंतर, मी स्टूप करतो, मी वाकून चालतो, चित्रपटांत मला लांब संवाद मिळायचे आणि पाॅझ घ्यायचा की नाही या विवंचनेत राहत असे, म्हणून मी एका श्वासातच लांब संवाद बोलून टाकायचो. पुढे ही देव आनंदची शैली बनली. त्याच्याबद्दल अफवा पसरली की, त्याला काळा शर्ट घालण्यास मनाई होती. कारण तरुण मुली त्याला भेटायला बेहोश झाल्या आहेत. जरी देव आनंदने ते हास्यास्पदपणे टाळले, पण असे घडायचे. 
         'काला पानी' (१९५२) या चित्रपटात काळे कपडे परिधान केलेले होते. काळे कपडे घालण्यास कोणत्याही सरकारने कधीही बंदी घातली नव्हती. 
देव आनंदला भारताचा पहिला 'शहरी नायक' असे म्हणतात, तो बलराज साहनी (दो बिघा जमीन), राज कपूर (तिसरी कसम) आणि दिलीप कुमार (गंगा जमुना) या चित्रपटांप्रमाणे रस्टिक भूमिका करू शकला नाही. त्याची शैली, त्याचे आकर्षण वेगळे होते, त्याला भारतातील 'ग्रेगरी पेक' म्हटले गेले, याला नशीब असे म्हणतात. नंतरच्या काही वर्षांत देव आनंदचे चित्रपट जसे की, लूटमार आणि गॅम्लर इतके प्रभावी नव्हते. समीक्षकांना त्याच्या अभिनयात असलेली खोली दिसली नाही. तथापि, त्याची सर्जनशीलता आणि उत्साह शेवटपर्यंत कायम राहिला. असा हा चिरतरुण देव आनंद ३ डिसेंबर २०११ ला लंडन येथे जगास परका झाला.

-वा. पां. जाधव ( ९४२२८५६५७२ )