शेतात राबणाऱ्या कार्यकर्त्याला थेट आमदार बनवलं !
राजकीय किस्से
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-12-04 15:02:19
गोष्ट तेव्हाची जेव्हा राजकारणात पैशापेक्षा शब्द महत्त्वाचा होता. कोल्हापूरचे उदयसिंहराव गायकवाड हे तेव्हा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये दोन गट होते. इतर पक्षांपेक्षा कॉंग्रेसमधल्या या दोन गटांतच मोठी स्पर्धा असायची. या स्पर्धेमध्ये अनेकदा छोटे कार्यकर्ते भरडले जायचे. एकदा असेच झाले. शिरोळ तालुक्यातल्या घोसरवाडचा दशरथ नरसिंगा कांबळे हा कार्यकर्ता जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडला गेला होता. घरची परिस्थिती बेताचीच होती. हातावर पोट होतं.
एकदा राजकारणामुळे कोणी तरी दशरथ कांबळेंची झोपडीच पेटवून दिली. त्याचा संसार उघड्यावर आला. दशरथ कांबळे काँग्रेसच्या ज्या गटात होते, त्या गटाच्या विरोधातले नेते त्यांना आपल्या सोबत ये म्हणून दमदाटी करत होते. त्यातूनच त्यांची झोपडी पेटवण्याचा प्रकार घडला. दशरथ कांबळेंबरोबर जे घडलं ते उदयसिंहराव गायकवाडांना कळालं. ते जिल्हा परिषदेत नेते होते. ते दशरथ कांबळेंच्या भेटीला त्यांच्या झोपडीत गेले. गायकवाडांच्या सोबत शिरोळ तालुक्यातील नेते दिनकरराव यादव, दत्तवाडकर सरकार, डॉ. देसाई अशी नेते मंडळी होती. रात्रीचे बारा वाजले असतील. गायकवाड दशरथला समजावून सांगत होते की, तुझ्यावर एवढा दबाव येत असेल तर तू त्यांच्या गटात जा. पण दशरथ ऐकायला तयार नव्हता. अचानक तो रडायलाच लागला.
कसेबसे डोळे पुसले आणि म्हणाला, “गायकवाडसाहेब, मी जातिवंत कार्यकर्ता आहे. त्यांनी त्रास दिला म्हणून मी तुम्हाला सोडून कसा जाऊ? मेलो तरी मी बदलणार नाही.” अक्षरशः घर जळालेले आहे आणि हा कार्यकर्ता आपल्याला सोडून जाणार नाही म्हणतोय हे बघून त्या तिन्ही नेत्यांना भरून आलं. गायकवाड साहेब गाडीत बसता बसता त्यांना म्हणाले, ‘‘ दशरथ मला संधी मिळाली नां तर तुझ्यासाठी मी जरूर काही तरी करेन एवढं लक्षात ठेव.”
पुढे दहा वर्षांचा काळ लोटला. पंचगंगेच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. उदयसिंहराव गायकवाड शाहूवाडी तालुक्यातून आमदार झाले. त्यानंतर मंत्रीदेखील झाले. जिल्ह्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. त्यांनी गायकवाडांना आपल्या चेंबरमध्ये बोलवून घेतलं.
कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकररावांनी तातडीने बोलावलं म्हटल्यावर गायकवाडांना कळेना नेमकं काय झालंय? गडबडीने ते मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये आले. तिथे गेल्यावर दिसलं की, कोल्हापूर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंतराव भिडे आले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, “इंदिरा गांधींचा फोन आला होता, कोल्हापूर नगरपरिषदेतर्फे विधान परिषदेवर एका व्यक्तीची निवड करायची आहे. कोणा योग्य माणसाचं नाव तुमच्या डोळ्यासमोर असेल तर सुचवा.” उदयसिंगराव गायकवाडांना दहा वर्षांपूर्वीचा घोसरवाडमधला प्रसंग आठवला. त्यांनी एका क्षणात उत्तर दिल, “दशरथ नरसिंग कांबळे” अनंतराव भिडेंनादेखील आश्चर्य वाटलं. त्यांनी खात्रीतला कार्यकर्ता आहे का, याची चौकशी केली. गायकवाडांनी सांगितलं की, “कार्यकर्ता तुमच्या भागातील आहे, प्रामाणिक आहे, त्याची खात्री मी देतो.” शंकरराव चव्हाणांनी सांगितलं की, वेळ घालवू नका, त्याचा फॉर्म भरून घ्या. लगेच कोल्हापूरला सखाराम खराडे यांना फोन करण्यात आला आणि निरोप दिला की, घोसरवाडमधल्या दशरथ नरसिंग कांबळेंना शोधून आणा आणि त्यांचा फॉर्म कलेक्टर ऑफिसमध्ये जमा करा. कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांनी शेतात काम करत असलेल्या दशरथ कांबळेंना शोधून काढलं.
ते आता राजकारणापासून खूप दूर निघून आले होते. त्यांना कळेना काय झालंय? कार्यकर्त्यांनी त्यांना थेट कोल्हापूरला आणलं. तिथे नवीन धोतर, शर्ट, टोपी विकत घेतली, दशरथ कांबळेंना ती घालायला लावली आणि वाजत गाजत कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांचा विधान परिषदेचा फॉर्म भरला. शेतात राबत असलेला कार्यकर्ता थेट आमदारकीला निवडून आला.
आजकाल नेतेमंडळी बसता उठता अशी आश्वासने अनेकांना देत असतात. काळाच्या ओघात ही आश्वासने विरून जातात, पण नेत्यांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे दशरथ कांबळे यांच्यासारखे कार्यकर्ते आणि शब्दाला जागणारे गायकवाड यांच्यासारखे नेते आज शोधूनही सापडणार नाहीत.