द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
ढगाळ हवामानामुळे ‘भुरी’, ‘डावणी’चा प्रादुर्भाव, महागड्या औषधांची फवारणी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-04 15:12:39
लोकनामा प्रतिनिधी
शिरवाडे वणी : येथे व परिसरात दोन ते तीन दिवसांपासून सतत ढगाळ हवामान, थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने तसेच हवामान खात्याकडून वारंवार येत असलेला पावसाचा इशारा यांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले असून, द्राक्षबागा वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे.
परिसरात द्राक्षाचे प्रामुख्याने नगदी पीक म्हणून ओळखले जाते. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये अतिवृष्टी, बेमोसमी पाऊस, खराब हवामान, कमी-अधिक उत्पादन, भावामध्ये चढ-उतार यांमुळे हे पीक दिवसेंदिवस संकटात सापडत आहे. द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन-तीन दिवसांपासून परिसरात सतत ढगाळ हवामान असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता अधिकच वाढत चालली आहे.
सध्याच्या स्थितीत परिसरातील सप्टेंबर महिन्यात छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर ढगाळ हवामानामुळे भुरी व डावणी रोगांना आमंत्रण मिळत आहे. तसेच काही द्राक्षबागा द्राक्षमण्यामध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे ढगाळ हवामान तसेच हवामान खात्याचा वारंवार पावसाचा इशारा येत असल्यामुळे तो अंदाज खरा ठरला, तर मण्यांना तडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परतीच्या माॅन्सूनमुळे उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागा फुलोरा अवस्थेत असल्यामुळे मणीगळ व खराब हवामानामुळे होत असलेली घडांची कुज थांबविण्यासाठी महागड्या औषधांच्या फवारण्या करूनदेखील रोग आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून समजते. मागील पंधरवड्यात वातावरण निरोगी असल्यामुळे द्राक्ष घडांची नैसर्गिक मणी विरळणी करण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना विविध प्रकारचे प्रयोग करावे लागले.
यंदा परतीच्या पावसाने थैमान घातल्यामुळे द्राक्षबागांची छाटणी काही प्रमाणात लांबणीवर पडली. परिणामी अशा द्राक्षबागांना हवामानाचा फटका बसण्याची शक्यता वाटू लागली आहे. मागील वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे व उशिरा छाटणी केलेल्या द्राक्ष उत्पादकांना बऱ्यापैकी पैसे मिळाल्यामुळे ‘कही खुशी, काही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
द्राक्ष उत्पादक कायम संकटात
द्राक्षाचे पीक वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी डोळ्यात तेल घालून सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाप्रमाणे सतत उभे राहावे लागते. उत्पादन घेऊनदेखील द्राक्ष माल तयार होऊन विक्री करत असताना व्यापारी पैसै बुडवून पलायनाचादेखील दिवसेंदिवस द्राक्ष उत्पादकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे द्राक्ष विक्री होऊन त्याचे पैसे हातात येईपर्यंत चातकाप्रमाणे वाट बघावी लागते. सर्वच द्राक्ष उत्पादकांना पैसे मिळत नसल्यामुळे द्राक्षाची शेती दिवसेंदिवस उत्पादक शेतकऱ्याला संकटात लोटताना दिसत आहे.