औरंगपूर - भेंडाळी उपबाजाराला शेतकऱ्यांची पसंती

जवळची बाजारपेठ, तत्पर सेवेमुळे शेतमालाची वाढतेय आवक

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-04 15:15:53

लोकनामा का.प्र.
निफाड : पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या नव्याने कार्यान्वित झालेल्या औरंगपूर- भेंडाळी येथील उपबाजार आवारावर मका, सोयाबीन व भुसार शेतमालास चांगला दर मिळत असल्याने येथे शेतमाल विक्रीला शेतकऱ्यांची अधिक पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उपबाजार आवार इमारत तसेच शेतमाल वजनासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रिक भुईकाटा आदींची कामे प्रगतिपथावर आहेत. बाजार समिती सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या प्रयत्नांतून या उपबाजार आवाराला सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन बाजार समितीच्या संचालिका मनीषा सोपानराव खालकर यांनी म्हटले आहे.  
        निफाड, सिन्नर तालुक्यांच्या सीमेलगत वसलेल्या औरंगपूर- भेंडाळी येथे सायखेडा- हिवरगाव रस्त्यालगत असणारे उपबाजार आवार आता खासगी बाजार समित्यांशी स्पर्धा करू लागले आहे. खासगी बाजार समित्यांपेक्षा जास्त दर येथे शेतमालाला मिळत असल्याने शेतकरी आपला शेतमाल या उपबाजार आवारात विक्रीला प्राधान्य देत आहेत. कारण, जवळच हिवरगाव येथे सिन्नर बाजार समितीचे उपबाजार आवार सुरू आहे. तसेच याच ठिकाणी खासगी बाजार समितीदेखील आहे. मात्र, शेतीमालाचे चोख वजनमाप आणि रोख चुकवती यांबरोबरच तत्पर सेवा यांमुळे हे उपबाजार आवार शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.
            आमदार बनकर यांच्या प्रयत्नांतून सायखेडा, पालखेड, ओझर आणि आता औरंगपूर- भेंडाळी उपबाजार आवार कार्यान्वित झाले आहे. या आवारामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. साहजिकच सिन्नर तालुक्यातील वडांगळी, मेंढी, कोमलवाडी, घगाळवाडी, केपानगर, हिवरगाव, निमगाव, किर्तांगळी, खडांगळी, सोमठाणे आदी गावांसह निफाड तालुक्यातील महाजनपूर, रामनगर, तळवाडे, निपाणी पिंपळगाव, सोनेगाव, म्हाळसाकोरे, करंजगाव, भुसे, बागलवाडी, मांजरगाव, खानगाव थडी, तारुखेडले, तामसवाडी, करंजी खुर्द, ब्राह्मणवाडे, दिंडोरी व इतर गावांतील शेतकरी या उपबाजारात शेतमाल विक्रीला प्राधान्य देतात. हमाल माथाडी आणि व्यापारी यांची सौजन्याची वागणूक तसेच कर्मचारी वर्गाची तत्पर सेवा आणि बाजार समिती संचालकांचे उपबाजार आवाराकडे विशेष लक्ष आणि समाजसेवेचे अंगीकारलेले व्रत यांमुळे हा उपबाजार शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या आवारामुळे परिसरात दळणवळण वाढले असून, तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगधंदे वाढीस लागल्याने परिसराचादेखील कायापालट होताना दिसत आहे.  

 विकासाला चालना मिळाली

निफाड तालुक्याच्या सरहद्दीवर असणारी ही गावे दळणवळणाच्या दृष्टीने आडवळणाची वाटत होती. मात्र भेंडाळी-औरंगपूर येथे पिंपळगाव बाजार समितीने उपबाजार आवार सुरू केल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे, तसेच गावासह परिसरातील महिला, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जमिनीलादेखील सोन्याचे भाव आले आहेत. उपबाजार आवारामुळे छोटे-मोठे व्यवसाय सुरू झाल्याने अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटला आहे. शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 

- गोरख खालकर, कृष्णा इंधे, शेतकरी, औरंगपूर.