‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची चौकशी करा’

शासनाचे नियम-अटी, निकष धाब्यावर बसवत अपात्र महिलांना लाभ

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-04 15:33:41

लोकनामा प्रतिनिधी
नामपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला वर्गाला खूश करण्यासाठी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. मात्र या योजनेत अनेक अटी व नियम धाब्यावर बसवत असंख्य अपात्र महिलांनी लाभ घेतल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
           राज्य व केंद्र शासन कोणतीही योजना अंमलात आणत असताना त्या योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी अटी व नियम टाकत असते. मात्र निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजनेत अटी व निकष बाजूला ठेवून ऑनलाइन अर्ज केल्यावर तत्काळ मंजूर करून असंख्य महिलांनी या योजनेचे पैसे खात्यावर जमा करून घेतल्याचे आता हळूहळू निदर्शनात येत आहे.  या योजनेत लाभ घेणारी महिला १८ ते ६५ वयोगटातील असणे गरजेचे होते, मात्र आधारकार्डवर खाडाखोड करून अनेकांनी बोगस वय दाखवून लाभ घेतल्याचे दिसत आहे. तसेच ज्या महिलांना संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा निवृत्तिवेतन योजना, असा लाभ मिळत होता, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा आदेश होता. मात्र या योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांनी लडकी बहीण योजनेतून पुन्हा लाभ घेतल्याचे सिद्ध झाले आहे. अनेक ठिकाणी काही महिलांच्या नावावर शेती आहे, त्या महिला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा तसेच संजय गांधी योजनेचा व लाडकी बहीण योजनेचा असा तिहेरी लाभ घेत असल्याचेही ग्रामीण भागात दिसत आहे. 
         एवढेच नव्हे, तर शासकीय पगार घेणाऱ्या शिक्षिका, शिपाई, अंगणवाडीसेविका मदतनीस महिला, पोलीसपाटील, कुटुंबातील कर्ता पुरुष डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, मोठे व्यापारी असलेल्या कुयुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर येत आहे. काही ठिकाणी इन्कम टॅक्स भरणाऱ्या घरातील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.  गैरमार्गाने बोगस लाभ मिळवून अनेक महिलांनी या  योजनेचा दुरुपयोग केला. एकतर्फी शासनाच्या  तिजोरीतून पैशांची लूटच होत आहे. शेवटी सरकार कोणाचेही असो, हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशावर बोगस लाभ दिला जात असेल, तर ती एक फसवणूकच म्हणता येईल. आगामी काळात शासकीय यंत्रणा प्रशासकीय पातळीवर बोगस मार्गाने अटी व शर्तींचा भंग करून मिळवलेला पैसा परत घेतील किंवा पुढील हप्ते बंद होतील, का शासकीय कारवाईस सामोरे जावे लागेल हे आता नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतरच स्पष्ट होणार आहे. 

नियम , अटींचा भंग

एका महिलेला एकाच योजनेचा लाभ घेता येतो, असा नियम आहे. मात्र नियम, अटींचा भंग करून खोटे स्वयंघोषणा पत्र देऊन विविध योजनांसह लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर आपोआप कारवाई होईल. 
-  शेखर अहिरे, संजय गांधी निराधार विभाग, सटाणा