प्रेमभंगामुळे रडलो; कामामुळे नाही
शाहीद कपूरने केले मनमोकळे
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-04 15:36:17

बॉलिवूडचा चाॅकलेट बॉय म्हणजे शाहीद कपूर. सुरुवातीला हलक्याफुलक्या प्रेमकथा केल्यानंतर शाहीदने नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिकांवर भर दिला. हैदर, रंगून, कबीर सिंग, उडता पंजाब, पद्मावत यांसारख्या चित्रपटांतून त्याने स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केली. लवकरच शाहीदचा ‘देवा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येईल. त्यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत वेगळा शाहीद समोर आला. करिना कपूरबरोबर ब्रेक अप झाल्यावर शाहीदने स्वत:ला सावरत करिअरवर फोकस केले. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. याविषयी तो मनमोकळं बोलला.
करिअरमधील चढउतारामुळे तू कधी खोलीत एकटाच बसून रडला आहेस का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर शाहीदने सांगितले की, माझा प्रेमभंग झाला होता, त्यावेळी मी खोलीत बसून एकटाच रडत असे. तो काळ वाईट होता. माझे मेकअप आर्टिस्ट म्हणायचे की, मी आताच मेकअप केला आहे, तू रडणे थांबवू शकत नाहीस का? आणि मी त्यांना म्हणत असायचो की, मी काहीच करू शकत नाही. मला वाटते की, मी स्वत:ला उद्ध्वस्त करून घेत आहे. मी माझ्या प्रेमभंगामुळे रडलो आहे, कामामुळे कधीच नाही.
दरम्यान, लहान वयातच आपल्याकडे मुलांना (पुरुष) सांगितले जाते की, तुम्हाला इतरांना गोष्टी द्यायच्या आहेत, तुम्हाला संरक्षण करायचे आहे आणि घरचा कर्ता पुरुष व्हायचे आहे. ज्या गोष्टी आवडतात, त्याचे संरक्षण करण्यासाठी पुरुष नेहमीच काळजीत असतात. कधीकधी यामुळे ते ताणतणावात असतात. काही वेळा फक्त त्यांना आराम करायचा असतो. वाटत असते की, मला प्रत्येक गोष्टीची व माणसांची काळजी करायची नाही. मलाही कधीतरी असुरक्षित वाटू शकते आणि त्यावेळी इतर कोणीतरी माझे संरक्षण केले पाहिजे. हे खूप महत्त्वाचे बदल पुरुषांबाबत आपल्या समाजरचनेत व्हायला हवेत. शेवटी पुरुषही एक माणूसच आहे. त्याने का सतत कणखर, खंबीर राहायचे. त्याने का कधी इमोशनल नसावे? आपण आपल्या भूमिका, जबाबदाऱ्या का बदलत नाही? पुरुष आहे म्हणून त्याने कधीच कोलमडून पडू नये? त्याने का मनमोकळे रडू नये? असे प्रश्न मला पडतात, असेही शाहीदने सांगितले.