रिंकू राजगुरू ‘जिजाई’च्या भूमिकेत
मुहूर्त पडला पार; लवकरच चित्रीकरणास प्रारंभ
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-04 15:38:55
सैराट या चित्रपटातून एका रात्रीत स्टार झालेल्या रिंकू राजगुरूने तिच्या सौंदर्याने, तसेच अभिनयाने अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख तयार केली. रिंकू नेहमीच फोटोशूट, शैक्षणिक करिअर व चित्रपट या तिन्ही पातळ्यांवर बिझी असते. मात्र, तिन्ही आघाड्या ती यशस्वीपणे सांभाळत आहे. ‘कागर’, ‘२०० हल्ला हो’ , ‘अनकहीं कहाँनिया’ , ‘झुंड, ‘झिम्मा २’ असे चित्रपट करत तिने कारकिर्दीला आकार देऊ केला आहे. आता रिंकूने तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘जिजाई’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच ‘जिजाई’चा मुहूर्त पार पडला. ‘जिजाई’च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होईल. झी स्टुडिओज् व कोकोनट फिल्म्स यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. यात रिंकू राजगुरू हातात जिजाई चित्रपटाच्या मुहूर्ताची पाटी घेऊन उभी आहे. “शुभारंभ झाला, आता आपला आशीर्वाद असू द्या! झी स्टुडिओज् व कोकोनट फिल्म घेऊन येत आहे, रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला, नवा कोरा मराठी सिनेमा ‘जिजाई’” असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. या पोस्टमध्ये रिंकूला टॅग केले आहे. रिंकूनेही ही पोस्ट शेअर केली आहे. तृशांत इंगळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जिजाई या चित्रपटात रिंकू प्रमुख भूमिका साकारत आहे. तिचा मराठमोळा अंदाज या चित्रपटात पाहायला मिळेल.