लाडकी बहीण लाभार्थी अर्जांची पडताळणी करणार
सत्ता हाती येताच महायुतीचा यु टर्न
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-04 17:44:24
मुंबई:- लाडकी बहीण योजना महायुती सरकारला चांगलीच पावली. लाडक्या बहिणींनी विक्रमी मतांनी महायुतीला मताधिक्य मिळवून दिले. मात्र सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू होताच, प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे,
राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला, त्या सर्वांना प्रति महिना १,५०० रुपयांचा लाभ दिला गेला. तसेच निवडणुकीनंतर सत्ता आल्यास २,१०० रुपयांचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत, यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळेच अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबविली जाणार आहे.लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी, यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
हे असणार निकष
१) उत्पन्नाचा दाखला – अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५ लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल.
२) प्राप्तीकर प्रमाणपत्र – अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल.
३) निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी – ज्या अर्जदारांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते, त्यांची वेगळी छाननी केली जाईल.
४) जमिनीची मालकी – ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
५) प्रति कुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश – कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला येणार नाही.