...अखेर महाराष्ट्र हसला

Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-05 11:35:04

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, याचा फैसला अखेर अकरा दिवसांनंतर का होईना झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी पूर्ण बहुमत दिले असताना मुख्यमंत्री कोण होणार यावरून नवा सरकारचा शपथविधी सोहळा लांबला होता. ‘तारीख पे तारीख’ असा न्यायालयीन कामकाजासारखा खेळ सुरू होता. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर महायुती सरकारला मिळालेले यश पाहता राज्यात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. मिळालेले बहुमत पाहता राज्यात लागलीच नवीन सरकार सत्तारूढ होईल, असे वाटत होते. मात्र, मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर होण्याऐवजी केवळ बैठकांचा खेळ सुरू होता. त्यात गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करणारे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने सस्पेन्स निर्माण झाला होता. त्यामुळे ऐन थंडीत राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. मात्र, बुधवारी (दि. ४) महायुतीतील तिन्ही नेते पत्रकार परिषदेत एकत्र आले व एकमेकांना चिमटे काढत, फिरकी घेत हास्यविनोदात रमले. त्यामुळे महायुतीतील नेत्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा परतले असून, नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. आजच्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा परतले आहे. थोडीशी कुरबुर असली, तरी यावर वाटाघाटीतून तोडगा निघणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी सलग तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर फडणवीस यांना हा मान मिळाला आहे.   अर्थात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते तीन दिवसच मुख्यमंत्री पदावर राहिले. तिन्ही वेळेस त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या व तिन्ही वेळेस भाजपचे शंभरपेक्षा जास्त आमदार निवडून आले. आता महाराष्ट्राच्या कारणात उपमुख्यमंत्री झालेला नेता पुन्हा मुख्यमंत्री होत नाही हा प्रघात देखील मोडीत काढला आहे. २०२२ मध्ये उपमुख्यमंत्री राहिले फडणवीस दोनच वर्षांत पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे. भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असताना, त्यांचे नाव जाहीर करण्यासाठी भाजपला अकरा दिवसांचा कालावधी लागला. मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करण्यास उशीर म्हणजे भाजप पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब करणार, असे वाटत होते. मात्र, भाजपकडे फडणवीस यांच्यापेक्षा दुसरा राजकीयदृष्ट्या सक्षम उमेदवार नव्हता, हेही तितकेच खरे. मात्र, गेले काही दिवस राज्यातील जनतेला झुलवत ठेवत भाजपने पुढील पाच वर्षांचे नियोजन केलेले दिसते. राज्यातील यश हे महायुतीचे असले, तरी भाजप हाच मोठा भाऊ ठरला आहे. राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर झालेल्या संयुक्तिक पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नावाची मुख्यमंत्रिपदी घोषणा केल्याची आठवण सांगितली. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा मोह म्हणा किंवा हट्ट सोडत वरिष्ठांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. आज हीच वेळ शिंदे यांच्यावर आली आहे. अडीच वर्षे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे शिंदे आता उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का, असा प्रश्न आहे. याबाबत त्यांना विचारण्यात आले असता, त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. सत्तेच्या सारीपाटावरील प्याद्यांची घरे आता बदलली आहेत. गेली अडीच वर्षे अडीच घरे चाल खेळणारे फडणवीस यांच्यासाठी आता मैदान साफ झाले आहे. भाजपचे निवडून आलेले आमदार पाहता त्यांना आता कोणाची गरज राहिलेली नाही. मात्र, सन २०१९ चा अनुभव पाहता भाजपला आता महायुती खंडित करणे शक्य नाही. अन्यथा भाजपच्या माथी पुन्हा युती तोडल्याचा शिक्का बसला असता. हे सर्व टाळण्यासाठीच त्यांनी इतके दिवस एकनाथ शिंदे यांची मनधरणी सुरू ठेवली. मात्र, हे करताना त्यांनी सत्तेतील वाट्यात कोणतीही तडजोड केलेली दिसत नाही. शिंदे यांच्या चेहऱ्यावर आज हसू दिसत असले, तरी सत्तेतील सहभागाबद्दल त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. शिंदे यांना पुढील पाच वर्षे हे हसू असेच कायम ठेवावे लागणार आहे. कारण महायुतीशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक दिसत नाही. शिंदेंनी कोणताही अाततायी निर्णय घेतला, तरी तो भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे. घटनेत असंवैधानिक असणाऱ्या तडजोडीच्या उपमुख्यमंत्रिपदावर त्यांना पुढील पाच वर्षे तरी समाधान मानावे लागणार आहे. विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महायुतीचे सरकार असले, तरी सर्वांच्या मनातील गोष्टी पूर्ण करता येतील असे नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. पुढची वाट ही आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षाची आहे. आपले महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र जावे लागेल, तसेच ज्यावेळी इतके मोठे बहुमत असते, तेव्हा काही गोष्टी मनाविरुद्ध होतील, पण आपण सर्व एकत्रितपणे काम करू आणि आपली शक्ती काय आहे, हे पुन्हा दाखवून देऊ, असे सूचक वक्तव्य केले. तीन इंजिनचे हे सरकार महाराष्ट्राला विकासाच्या नव्या वाटेवर घेऊन जाईल, अशी अपेक्षा बाळगू या! राज्यातील उद्योगधंदे, येऊ घातलेले प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार नाहीत. त्याचबरोबर ईडी, सीबीआय आदी संस्थांची वक्र नजरदेखील महाराष्ट्रावर आता पडणार नाही, अशी आशा बाळगू या. महायुतीतील नेत्यांच्या चेहऱ्यावर आलेले हे हास्य असेच कायम राहील व महाराष्ट्रदेखील पुढील पाच वर्षे असाच हसत राहील, अशी आशा करू या!