चढणार होता बोहल्यावर, पण जावे लागले सरणावर !

युवा कुस्तीपटू विक्रमचा जिममध्येच मृत्यू

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-05 13:17:27

पुणे :- कुस्तीच्या आखाड्यात  भल्याभल्यांना चितपट करणारा, कमावलेली पिळदार शरीरयष्टी लाभलेला, कुमार महाराष्ट्र केसरीचे मानाचे बिरुद आपल्या नावापुढे मिरवणारा असा विक्रम पारखी त्याच्या आयुष्यालाच पारखा झाला. १२ डिसेंबरला बोहल्यावर चढून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या विक्रमवर काळाने हृदय विकार झटक्याच्या रुपात घाला घातला. तो अवघ्या ३० वर्षांचा होता.  विक्रमच्या जाण्याने कुस्तीक्षेत्रासह मुळशीवर शोककळा पसरली  आहे. 

  मुळशी तालुक्यातील माण गावातील एका खासगी जिममध्ये नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी विक्रम गेला होता.  मात्र व्यायाम करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तो तेथेच खाली कोसळला. विक्रमला तात्काळ पिंपरी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

  विक्रमने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शड्डू ठोकत अनेक किताब पटकावले होते. पुढे ही अनेक आखाडे गाजविण्याची क्षमता विक्रममध्ये होती, मात्र नियतीला काही हे मान्य नव्हतं.  घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु असताना अचानक त्याच्या मृत्युची बातमी येऊन धडकल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

मुळशीचा भूमिपुत्र असलेल्या पैलवान विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरून मानाची गदा मिळवण्याचा पराक्रम केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद द्वारे २०१४ साली वारजे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते. या शिवाय विक्रमने अनेक राष्ट्रीय पदके आणि किताब पटकावले होते.  आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे आणि विक्रम पारखीचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी १९९ च्या कारगिल युद्धात लढा दिला होता. लष्करात राहून वडिलांनी देशाची सेवा केली होती.