सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार

थोडक्यात बचावले; हल्लेखोराचे खलिस्तानी संबंध

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-05 13:30:15

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर एकाने गोळीबार केला. या हल्ल्यात बादल थोडक्यात बचावले. घटनेनंतर उपस्थित लोकांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र हा गोळीबार का करण्यात आला? याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.         

  सोमवारी (दि. २) बादल यांना ‘अकाल तख्त’कडून शौचालय स्वच्छतेची धार्मिक शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे पाय फ्रॅक्चर असलले बादल व्हीलचेअरवर बसून सुवर्ण मंदिराबाहेर सेवा देत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव नारायण सिंग चौरा असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जवळच्या लोकांनी रोखल्याने चौरा याने झाडलेली गोळी भिंतीवर जाऊन आदळली. हल्लेखोर नारायण सिंग चौरा याचा खलिस्तानी दहशतवाद्यांची संबंध राहिला आहे. चौरा याच्या विरोधात यापूर्वी बेकायदा कृत्यविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत (यूएपीए) अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच दहशतवादासंबंधी कारवायांमध्ये सहभागाबद्दल त्याला तुरूंगातदेखील टाकण्यात आले होते. चौरा हा १९८४ मध्ये पाकिस्तानात निघून गेला होता आणि दहशतवादी कारवायांसाठी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करत असे. पाकिस्तानमध्ये असताना त्याने गनिमी कावा यासंबंधी आणि देशविरोधी पुस्तकेदेखील लिहिली. सन १९९०च्या दशकामध्यात तो भारतात परत आला आणि त्यानंतरदेखील तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेत राहिला. चौरा याला बुरैल तुरुंग फोडण्याच्या प्रकरणातदेखील अटक करण्यात आली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या मारेकर्‍यांना २००३-२००४ मध्ये चंदीगडच्या बुरैल तुरुंगात मोबाईल आणि इतर अवैध साहित्य पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. पुढे चौरा याची २०२२ मध्ये जामिनावर सुटका झाली. त्याच्यावर अमृतसर, रोपर, तरन तारन यांसह पंजाबमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.