देवेंद्र फडणवीस बनले राज्याचे २१ वे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांची नाराजी उघड

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-05 18:22:00

मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळूनही लांबणीवर पडलेला  महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर  पार पडला. प्रचंड जनसमूदायाच्या साक्षीने तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत  सुरुवातीला देवेंद्र फडणवीस  यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ, राजनाथसिंह, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच भाजपशासित राज्याचे  मुख्यमंत्री  या सोहळ्यास उपस्थित होते.

दिग्गजांची मांदियाळी

या सोहळ्यासाठी राज्यातील तसेच देशभरातील उद्योग, मनोरंजन तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. गौतम अदानी, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, माधुरी दीक्षित, डॉ.श्रीराम नेने,  सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन, मुकेश अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, सिद्धार्थ रॉय कपूर, विकी कौशल, जान्हवी कपूर,खुशी कपूर, बोनी कपूर, कुमार मंगलम बिर्ला, संजय दत्त यांसारखे दिग्गज कलाकारांची मांदियाळी यावेळी उपस्थित होती. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास दानवे , नीलम गोऱ्हे, नारायण राणे, उदयनराजे भोसले, राम नाईक  अजय पिरामल, उदय कोटक यांचीही सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती. तसेच   विक्रांत मेसी, जय कोटक, एकता कपूर,  अनंत अंबानी,  विद्या बालन,  अनिल अंबानी,  गीतांजली किर्लोस्कर, बिरेन्द्र सराफ, राजेश अदानी, मनोज सैनिक, के के तातेड़, मृदुला भाटकर, निखिल मेसवानी, हेतल मेसवानी, नीरजा चौधरी, योगेश पुढारी, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, सतीश मेहता, एटली,   श्रद्धा कपूर, बादशाह, जयेश शाह, जॉन इब्राहिम, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, आलोक संघवी, ज्योति पारेख, आलोक कुमार, अरविंद कुमार या दिग्गजांनी देखील या सोहळ्यास उपस्थिती लावली. 

फडणवीसांनी घेतले आईचे आशीर्वाद      

 राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी  देवेंद्र फडणवीस  यांनी  सिद्धीविनायक गणपतीचे तसेच मुंबादेवीचे दर्शन घेतले.फडणवीस यांनी सागर बंगल्यावर गोमाता पूजनही केले.  ना.फडणवीस यांनी त्यांच्या आईंचेही आशीर्वाद घेतले.  आई सरिता फडणवीस यांनी त्यांचे औक्षण केले. दरम्यान, देवेंद्र हे सहाव्यांदा आमदार, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचे त्यांची पत्नी अमृती फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र यांना राज्याच्या कल्याणासाठी काम करायचे आहे, ते जे करायचे ठरवतात, ते करुनच राहतात असेही अमृता यांनी सांगितले.          

  या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांना या सोहळ्याचे विशेष आमंत्रण देखील होते. आझाद मैदान व सभोवतालचा परिसर भगवे झेंडे, महायुती घटक पक्षातील नेत्यांचे बॅनर्स, नरेंद्र मोदींचे बॅनर्सने सज्ज करण्यात आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी या सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी, मिठाई वाटप करण्यात आले. 

एकनाथ शिंदेंची नाराजी भरली नजरेत

 महायुतीला जरी स्पष्ट बहुमत मिळाले तरी भाजपाने मंत्रीमंडळ रचना करताना  एकनाथ शिंदे व अजित पवार यांना खड्यासारखे बाजूला केले होते. नाही मुख्यमंत्री तर निदान गृहमंत्री पद तरी मिळावे या मागणीसाठी एकनाथ शिंदे हटून बसले होते. ते या सोहळ्यात शपथविधी घेतील की नाही? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले होते.    मात्र भाजपाच्या हायकमांडपुढे त्याचे एक चालले नाही आणि नाईलाजाने का होईना ते या सोहळ्यात सहभागी झाले.  या दिमाखदार सोहळ्यात मात्र  एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाराजी ठळकपणे दाखवून दिली. सुरुवातीला अमित शहा यांना सह्याद्री अतिथीगृहावर भेटण्याचे त्यांनी टाळले. त्यानंतर सोहळ्यासाठीच्या स्टेजवर देखील अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसलेले दिसले तर एकनाथ शिंदे या दोघांपासून थोड्या अंतरावर बसलेले दिसले तसेच उपमुख्यमंपित्रपदाची शपथ घेतानाही एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसून येत होती.