देवेंद्र ‘बाहुबली’!

Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-06 12:25:18

राज्यातील पाच वर्षांच्या राजकीय उलथापालथीनंतर महाराष्ट्राला आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार लाभले आहे. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही टॅगलाइन घेऊन महायुतीच्या या तीन इंजिन सरकारचा शपथविधी सोहळा रंगला. 'थांबायचं नाय गड्या...आता घाबरायचं नाय...दे धक्का...' म्हणत हे सरकार आता राज्यात पुढील पाच वर्षे निर्धोकपणे राज्यसकट हाकलतील, यात शंका नाही. राज्यात भाजपला मिळालेले बहुमत पाहता या सरकारला अंतर्गत अथवा बाह्य असा कोणताही धोका जाणवत नाही. ११ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर का होईना मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागली आहे. सगळी राजकीय समीकरणे पाहता फडणवीस हे आता राज्यातील ‘बाहुबली’ नेते ठरले आहेत. याआधी ही उपाधी शरद पवार यांच्याकडे होती. सन २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात १०५ जागा मिळवून भाजप एक नंबरचा पक्ष झाला असतानाही युतीत मुख्यमंत्रिपदावरून तणाव निर्माण झाला आणि त्याचा फायदा शरद पवार यांनी घेत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. मात्र, अडीच वर्षांतच फडणवीस यांनी राजकीय डावपेच टाकत हे सरकार तर पाडलेच, पण शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचेदेखील विभाजन करत शरद पवार यांची परतफेड केली. फडणवीस यांनी गुरुवारी (दि. ५) शपथ घेत राज्याच्या राजकारणात इतिहास रचला आहे. शरद पवार यांच्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. राजकीय गोटात त्यांची याआधी ‘चाणक्य’ म्हणून ख्याती पसरली होती. राज्यात अडीच वर्षांत उपमुख्यमंत्री राहत व विविध योजना राबवत त्यांनी ‘देवाभाऊ’ ही पदवी लोकांमधून मिळवली. आता मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊन ते बाहुबली नेते ठरले आहेत. राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सलग तीनदा भाजपच्या आमदारांनी शंभरी गाठली. यावेळी महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले. तरीदेखील फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्यास उशीर होत असल्याने भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा यावेळी मूड बदलल्याची चर्चा होत होती. त्यातच दिल्ली दरबारी भेट देऊन तिन्ही नेते राज्यात पोहोचले तरी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होत नव्हती. शेवटच्या तीन दिवसांत मात्र फडणवीस यांनी योग्य टायमिंग साधत शिंदे यांची मनधरणी केली. शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार झाले असले, तरी ते उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नाखूश होते. मात्र, शपथविधीच्या दोन तास आधी फडणवीस यांनी त्यांचे मनपरिवर्तन करत अखेर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाबाबत राजी केलेच. महायुतीअंतर्गत कलहावर मात करत असताना फडणवीस विरोधकांनादेखील विसरले नाहीत. राजशिष्टाचार पाळत त्यांनी सर्वांना शपथविधीचे निमंत्रण तर दिलेच. मात्र, राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार व बोलके नेते राज ठाकरे यांना स्वतः फोन करून निमंत्रण दिले. शपथविधी कार्यक्रमानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. महायुतीतल्या आमच्या भूमिका बदलल्या आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतो. सन २०१९ ला ७२ तासांसाठी मी मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. आमचे रोल बदलले असले, तरीही दिशा तीच राहणार आहे, गती तीच राहील. मागच्या काळात आम्ही आलो तेव्हा ५० ओव्हरची मॅच होती. अजित पवार आले तेव्हा २०-२० ची मॅच झाली. आता टेस्ट मॅच आहे. त्यामुळे सगळे निर्णय योग्यपणे घेऊन आणि पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपण वाटचाल करणार असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले. मागील पाच वर्षांच्या कालखंडात फडणवीस यांनी संयम ठेवत विरोधकांचे टोमणे, शिव्या सहन केल्या. त्यांची जात, शारीरिक ठेवण, त्यांच्या पत्नीचे गाणे यावर टीका करत विरोधकांनी त्यांच्या सार्वजनिक व खाजगी आयुष्याचा एकही कोपरा शिल्लक ठेवला नाही. मात्र, या सर्व टीकेला फडणवीस यांनी संयमित उत्तर देत योग्य संधीची वाट पाहत राहिले. आता हाच संयमीपणा त्यांना यापुढेही कायम ठेवावा लागणार आहे. सरकार स्थापनेपर्यंत महायुतीत सुरू असलेली धुसफूस यापुढेही सुरू राहणार, असे दिसते. कारण महायुतीतील केवळ नेत्यांचा गुरुवारी (दि. ५) शपथविधी झाला आहे. याचा अर्थ महत्त्वाच्या खात्यांवर अद्याप एकमत झालेले दिसत नाही. शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच गृहखाते हवे आहे. मात्र, गृहखाते हवे असेल तर त्यांनी नगरविकास खात्यावरील दावा सोडावा, असा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे इतर मंत्र्यांचा शपथविधी रखडला आहे. आधी सरकार स्थापन करून नंतर खात्यांबाबत चर्चा करू, अशा निरोप शिंदेंना गेल्यानंतरच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अर्थात, शिंदेंवर भाजपचाच नाही, तर पक्षातील अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी व आमदारांचाही दबाव होता. सरकारमध्ये शिंदे सहभागी झाले नसते, तर शिवसेनेच्या आमदारांकडे दुर्लक्ष होऊन त्यांच्या मताला फारशी किंमत राहिली नसती. त्यामुळे सरकारमध्ये शिंदेंचा सहभाग हा महत्त्वपूर्ण होता. आता सरकार स्थापन झाले असले, तरी फडणवीस यांची कसोटी मंत्रिपदाचा विस्तार करताना लागणार आहे. अजित पवार यांच्याबरोबर एकनाथ शिंदे हेही राज्यातील कसलेले नेते आहेत. त्यामुळे महायुतीत समन्वय साधणे व या दोन नेत्यांना कशाप्रकारे अंकित ठेवायचे, याचे कसब फडणवीस यांना गेल्या अडीच वर्षांत आलेच आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.