डॉ. आंबेडकर अन् येवल्याचे नाते अतूट
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-12-06 12:48:58

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी राजे रघूजी शिंदे यांनी वसवलेले येवला शहर, सन १८५७ मधील स्वातंत्र्य समराचे थोर सेनानी सेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी, जगभरात प्रख्यात येवल्याची पैठणी, अशा दुर्मिळ वैशिष्ट्यांच्या येवला शहराला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्म परिवर्तनाच्या ललकारीचा जाज्वल्य इतिहास आहे. समता व न्यायासाठी धर्म परिवर्तनाचा इतिहास घडविण्याकामी फार महत्त्वाची भूमिका येवल्याच्या मुक्तिभूमीत महामानव डॉ. आंबेडकर यांनी बजावली आहे. सन १९३२ मध्ये येवला तालुक्यातील मुखेड येथे पांडवप्रताप ग्रंथदिंडीवरून झालेल्या सत्याग्रहाचा धागा पकडून येवला शहरात १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला शहरात ऐतिहासिक धर्म परिवर्तनाची घोषणा केली. डॉ. आंबेडकर यांनी धर्म परिवर्तनाच्या लढाईचे फुंकलेले रणशिंग ही खऱ्या अर्थाने दलितांच्या उद्धाराची व धर्म महापरिवर्तनाची नांदी ठरल्याने येवला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट नाते राहिले आहे.
येवला येथील कोर्ट मैदानावर या दिवशी अखिल भारतीय मुंबई इलाखा बहिष्कृत हितकारिणीची परिषद मुक्तिभूमीवर भरली. या परिषदेत डॉ. आंबेडकरानी ऐतिहासिक धर्मांतराची घोषणा केली. जन्माला येणे माणसाच्या हाती नाही, जरी मी हिंदू म्हणून जन्मास आलो, पण हिंदू म्हणून कदापि मरणार नाही! अशी घोषणा त्यांनी केली आणि ती पूर्णत्वास नेली. या ऐतिहासिक घटनेनंतर तब्बल एकवीस वर्षांनी १४ ऑक्टोबर १९५६ला नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली. म्हणूनच नागपूर हा धर्मांतराचा कळस, तर येवला मुक्तिभूमी हा पाया आहे.
१३ ऑक्टोबर १९३५ ला अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या समाजाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबडेकर येवल्यात येणार असल्याची सूचना तत्कालीन स्वीकृत सदस्य मोतीराम साबळे यांनी येवला पालिकेला दिली. पालिकेने त्यांना बोलावून चहापान करावे, असा येवला पालिकेच्या प्रोसिडिंग १० ऑक्टोबर १९४५च्या सर्वसाधारण सभेत ठरावदेखील आहे. केवळ पंधरा रुपयांच्या चहापानाच्या खर्चावरून त्यावेळी मतदान झाल्याचा इतिहास आहे. परंतु त्यानंतर हा ठराव मंजूर झाला. सन १९३२ मध्ये मुंबई इलाखा बहिष्कृत हितकारिणी सभेची तहकूब झालेली सभा, येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी दुपारी दोनला डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरले. या सभेसाठी अमृतराव धोंडिबा रणखांबे (स्वागताध्यक्ष), भादुजी भिकाजी निकाळे (खजिनदार), जयराम सखाराम आहिरे (खजिनदार), दादासाहेब (भाऊराव) कृष्णाजी गायकवाड (सेक्रेटरी), मोतीराम लक्ष्मण साबळे (सेक्रेटरी) यांनी नियोजन करून परिषदेत दलित समाजाच्या आर्थिक, धार्मिक, सामाजिक बाबींचा विचार करणे हा मुख्य विषय या परिषदेत होता. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या येवल्यातील परिषदेत डॉ. आंबेडकरांनी भाषणात जाहीर केले की, यापुढे मंदिर प्रवेश सत्याग्रह, अगर पाणी सत्याग्रह, असा कोणत्याही प्रकारचा सत्याग्रह न करता धर्मांतर करणे हाच अंतिम उपाय आहे. धर्मांतराशिवाय गत्यंतर नाही. हिंदू संस्कृतीत कुठलाही बदल होणार नाही. म्हणून हिंदू म्हणून जन्मास आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा त्यांनी येवल्यात केली.
ही घोषणा म्हणजे हिंदू समाजास एक नोटीसच ठरली. धर्मांतराची घोषणा आणि दीक्षा समारंभाच्या मधल्या २१ वर्षांच्या काळात डॉ. आंबेडकरांनी अनेक धर्मांचा सखोल अभ्यास केला. अखेर हिंदू धर्मात सुधारणा होत नाही याचा अनुभव घेतल्याने या महामानवाने १४ ऑक्टोबर १९५६ला नागपूर येथे तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्थापलेल्या व जगाला शांतीचा महान संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन धर्मांतर केले. धर्मांतराची घोषणा येवल्यात झाली. तर बौद्ध धर्माचा दीक्षान्त सोहळाही येवल्यात व्हावा, अशी डॉ. आंबेडकराची इच्छा होती. त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना दीक्षा सोहळ्यासाठी येवल्यात जागा पाहण्यास सांगितले. पण या संधीचा फायदा घेण्यात येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्याचा चमू धार्मिक व आर्थिकदृष्ट्या कमी पडला. नागपूरचे वामनराव गोडबोले यांच्याकडे डॉ. आंबेडकर यांनी धर्मांतराचा विषय काढताच त्यांनी हा विषय उचलून धरत १४ ऑक्टोबर १९५६ला बौद्ध धर्माची दीक्षा घेत धर्मांतराची प्रतिज्ञा पूर्ण केली.
येवल्याच्या धर्मांतर घोषणेला मुखेड (ता. येवला) येथील पांडवप्रताप ग्रंथदिंडी सत्याग्रहाची पार्श्वभूमी आहे. सन १९३२ मध्ये श्रावण महिन्यात पांडवप्रताप ग्रंथाच्या पोथीचे मुखेड येथील दलित समाजाने पारायण लावले होते. दुपारी चारला दलितांनी पांडवप्रताप ग्रंथाची मिरवणूक काढली. ती मिरवणूक सवर्णांनी अडवली. याचवेळी नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू होता. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे लोण संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी सत्याग्रहातील पुढारी अमृतराव रणखांबे, टी. बी. काळे, सावळेराम दाणी, रामभाऊ पालजी मारू व माजी खासदार कर्मवीर दादासाहेब उपाख्य भाऊराव कृष्णराव गायकवाड हे मुखेडला आले होते.
मुखेडच्या मिरवणुकीला सवर्णांनी मज्जाव केला म्हणून दलितांचा बैठा सत्याग्रह मुखेडच्या वेशीजवळ सुरू झाला. हे वृत्त तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक व मामलेदार यांना सांगण्यासाठी अमृतराव रणखांबे येवल्याला आले. दरम्यान, सवर्णांनी बैठ्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या दलितांना त्रास देण्याचे धोरण अवलंबले. तरीही दलित सत्याग्रही मागे हटले नाहीत. विठ्ठलराव रणखांबे, सावळेराम दाणी, रूपजी वस्ताद पहिलवान हे सत्याग्रहाच्या अग्रभागी बसले होते. अखेर सवर्णांनी रागावून ‘महात्मा गांधी की जय’, ‘भारतमाता की जय’ , ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत वेशीजवळ होळी पेटवली. आगीच्या ठिणग्यांनंतरदेखील दलित सत्याग्रही हटले नाहीत. अखेर मार खात दलितांनी पळ काढला. विठ्ठल रणखांबे यांसह अनेक जण जखमी झाले. पांडवप्रताप ग्रंथासह पालखीला सवर्णांनी आग लावली. दरम्यान, अमृतराव रणखांबे, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व मामलेदार यांच्यासह मुखेडला आले. मुखेडच्या या सत्याग्रहाची लंडन टाइम्सने दखल घेत वृत्तपत्रातून या घटनेचे सत्य कथन केले. हे वृत्त आंबेडकरानी लंडनमध्ये वाचले. ही घटना अस्पृश्य समाजाला आपले प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघाद्वारे द्यायचे की संयुक्त मतदारसंघद्वारे या चर्चेला समर्पक ठरली. मुखेडला सवर्णांनी केलेल्या अत्याचाराबाबत महात्मा गांधींवर या सभेत डॉ. आंबेडकरांनी टीका केली.
गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी या वृत्ताच्या प्रती वाटल्या. मुखेडमध्ये ज्या गांधींच्या अनुयायांनी गांधी की जय, भारतमाता की जय म्हणून घोषणा देत दलितांनी रस्त्यावरून काढलेली हिंदू धर्मातील पांडवप्रताप ग्रंथाची पालखी मिरवणूक अडवून दलितांना रक्तबंबाळ होईपर्यत मारायचे, हा कसला धर्म?, भारताचे गांधीप्रणीत स्वराज्य व अशा मार्गाने हे लोक आमचा उद्धार करणार आहेत काय? लंडनहून ‘प्रबुद्ध भारत १९५७’चे लेखक दादासाहेब उपाख्य भाऊराव गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या मागण्यांचा प्रश्न मुखेड सत्याग्रहाने सोडविला. मुखेडकरांनी मार खाल्ला, त्याचे चीज झाले. या परिषदेत डॉ. आंबेडकर यांच्या हातात जातीय निवाड्याची व ऐतिहासिक ‘पुणे करारा’ची सनद मिळाली आणि दलितांचे खरे पुढारी म्हणूनही शिक्कामोर्तब झाले. मुखेडकरांनी मार खाल्ला असला, तरी तो कामी आला, म्हणून डॉ. आंबेडकर यांनी मुखेडकरांचे अभिनंदनही केले. या सत्याग्रहाला विशेष महत्त्व आहे. येवल्यात डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या राजवाड्याच्या चावडीत (कै.) पुंजोबानाना पवार जीवनाच्या अखेरपर्यत मुखेड येथील ऐतिहासिक सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर पांडवप्रताप ग्रंथाचे वाचन करत होते. त्यांना लागणारी चौरंगासह सर्व सेवा गंगादरवाजा येथील निवासी (कै.) रामभाऊ आबाजी महाले यांच्या घरातून पुरविली जात असे.
डॉ. आंबेडकरांची ही घोषणा येथील तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली. धर्मसंस्थाने हादरली. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले. अनेकांनी विरोध केला, तरीही केलेल्या संकल्पापासून जराही न ढळता वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली ती जागा म्हणजेच येवल्यातील न्यायालयाजवळील मैदान ‘मुक्तिभूमी’ नावाने ओळखले जाते. ही मुक्तिभूमी बौद्ध धर्मीयांचे तीर्थस्थानच बनले आहे. मुक्तिभूमीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन माजी मंत्री व विद्यमान आमदार छगन भुजबळ यांनी येवल्यात विश्वभूषण स्तूप, विपश्यना हॉल, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व डॉ. आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी साकारला आहे. मुक्तिभूमीचे सुशोभीकरण केले आहे. दरवर्षी अशोक दशमी व ४ एप्रिलला महामानवाची जयंती, तसेच ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशभरातून बौद्ध बांधव मोठ्या संख्येने मुक्तिभूमीवर लाडक्या भीमरायाला वंदन करण्यासाठी येतात.
- दत्ता महाले ( ७५८८०९७१११ )