आचरेकर सरांमुळे मॅच टेम्परामेंट तयार झाली : सचिन

सर रमाकांत आचरेकर स्मृती स्मारकाचे उद्‌घाटन

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-06 12:58:47

मुंबई : रमाकांत आचरेकर यांनाच प्रशिक्षक म्हणून का निवडले? या प्रश्नाला उत्तर मी आजवर कधीच दिले नव्हते. मात्र याचे श्रेय माझ्या भावाचे म्हणजेच अजित तेंडुलकरचे आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत माझ्या भावाचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यानेच माझ्यासाठी प्रशिक्षक म्हणून रमाकांत सरांची निवड केली. आणि सरांच्या तालमीत तयार झाल्यामुळेच मी यशस्वी झालो, असे सन्मानकारक उद्‌गार क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काढले. 
            दादरमधील शिवाजी पार्क येथे रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे उद््घाटन सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तो बोलत होता. आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी आणि कुटुंबीय, माजी क्रिकेटर प्रवीण आमरे, विनोद कांबळी यावेळी उपस्थित होते. अजितने माझ्या प्रशिक्षणासाठी रमाकांत सरांची निवड का व कशी केली? याचा खूप सुंदर किस्सा सचिनने यावेळी सांगितला. 
सचिनने सांगितले की, माझा भाऊ अजितदेखील क्लब आणि कॉलेजमध्ये क्रिकेट खेळायचा. अनेक मॅचेस तो खेळायचा. याच मॅचेसदरम्यान त्याने निरीक्षण केले की, मॅचेस सुरू असताना रमाकांत सरांच्या खेळाडूंना कोणतेच टेन्शन नसायचे. ते मस्त गाणी म्हणत, एन्जॉय करत मॅचेस खेळायचे. तर जे खेळाडू रमाकांत सरांकडे तयार झाले नव्हते, ते सतत दडपणाखाली असायचे. आता आपल्याला मैदानात जायचे आहे, कसे होईल, काय होईल? याच चिंतेत ते सतत असायचे. अजितच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्याने आणखी अभ्यास केला, तर त्याच्या लक्षात आले की, रमाकांत सरांकडे भरपूर प्रॅक्टिस सामने होतात. त्यामुळे खेळाडूची मॅच टेम्परामेंट तयार होते. तो कोणत्याही आव्हानाचा, दडपणाचा सामना करण्यास सिद्ध होतो. या निकषावरच त्याने माझ्यासाठी रमाकांत सरांना निवडले. मीदेखील खूप प्रॅक्टिस सामने खेळलो. पुढे कारकिर्दीत १०० कोटींहून अधिक क्रिकेट रसिकांच्या अपेक्षांचे ओझे मी पेलू शकलो ते सरांमुळेच, असे सचिनने पुढे सांगितले.