...पण तुम्ही रडले, तर जास्त पैसे देऊ !
अभिनेता चंकी पांडेने कपिल शोमध्ये केला अनुभव शेअर
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-06 13:01:26

बॉलिवूडमधील कलाकारांची क्रेझ भारतात नव्याने सांगायला नको. अमिताभ, शाहरुखच्या घराबाहेर आजही दर रविवारी चाहते गर्दी करतात. पूर्वी राजेश खन्ना याच्या गाडीमागे मुली वेड्यासारख्या धावत, त्याचे फोटो उशीखाली ठेवत. काही वेळेस त्या त्या चित्रपटाची फॅशन फॉलो केली जाते, तर काही वेळेस कलाकारांचे संवाद हिट होतात. या कलाकारांसाठी क्रेझी लोकं काहीही करू शकतात. अभिनेता चंकी पांडे याला आलेला अनुभव याची पुष्टी करणारा आहे.
अभिनेता चंकी पांडे द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा त्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, जेव्हा माझ्या करिअरला मी सुरुवात केली, तेव्हा जास्तीचे पैसे कमवायचा एकच स्रोत होता आणि तो म्हणजे कार्यक्रमांना जाणं. मला कोणीही बोलावलं की मी तिथे हजर व्हायचो. मग ते लग्न असो, वाढदिवस असो किंवा इतर काही असो, एके दिवशी सकाळी मला एका आयोजकाचा फोन आला. त्याने विचारलं की, आज काय करतोयस? मी म्हटलं की, मी शूटिंगसाठी निघालोय. मग तो म्हणाला, ‘वाटेत एक छोटासा कार्यक्रम आहे, १० मिनिटांसाठी ये, बरेच पैसे देत आहेत.’ मी होकार दिला. त्याने पांढरे कपडे घालून यायला सांगितलं, मी फार विचार न करता पांढरे कपडे घालून तिथे पोहोचलो. यापुढे जो अनुभव चंकीला आला, तो फारच आश्चर्यकारक होता. पुढे चंकी म्हणाला, “मी पोहोचलो आणि पाहिलं की बाहेर खूप लोक पांढरे कपडे घालून उभे आहेत. मी हळूहळू आत जाऊ लागलो. लोकं आपापसांत कुजबुजत होते की, चंकी पांडे आला आहे. मी विचार करत होतो की, नेमके काय चाललेय. तेवढ्यात मी तिथे एक पार्थिव पाहिले. मग मला समजले की, मी अंत्यसंस्काराला आलोय. मला वाटले की, मी पोहोचलो तोपर्यंत आयोजकाचे निधन झालेय. पण तिथे एका कोपऱ्यात मला आयोजक दिसले. ते म्हणाले, ‘‘सर, काळजी करू नका, माझ्याकडे तुमचे पाकीट (पैसे) आहे. पण तुम्ही रडले, तर जास्त पैसे देऊ, असे या कुटुंबाने म्हटले आहे.”