स्वप्नील दाखवणार पोलिसी खाक्या
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-06 13:10:50

दुनियादारी, पक पक पकाक, पोष्टर गर्ल, पुणे-मुंबई-पुणे यांसारख्या चित्रपटांतून नेहमीच लव्हर बॉय व चुळबुळ्या भूमिकेत दिसणारा स्वप्नील जोशी आता एकदम वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आपली सॉफ्ट, रोमँटिक इमेज बाजूला ठेवत किंबहुना त्या पठडीतून बाहेर पडण्यासाठीच त्याने ही भूमिका स्वीकारली आहे. स्वप्नील आता चक्क दबंग पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. आगामी जिलबी या सिनेमात स्वप्नीलने ही भूमिका साकारली आहे. आपल्या या भूमिकेविषयी बोलताना स्वप्नीलने सांगितले की, आपला पोलिसी खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे, पोलिसांचा अंदाज, त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी, यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकून पडायचे नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचे स्वप्नीलने सांगितले.