लवकरच काळोख संपणार, प्रकाश पसरणार...
हीना खानकडून उपचारादरम्यानचा फोटो शेअर
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-07 13:53:22

ये रिश्ता क्या कहलाता' या मालिकेत अक्षराची भूमिका साकारून घरोघरी लोकप्रिय झालेली हीना खान आयुष्यातील सर्वांत कठीण, खडतर काळाचा सामना करत आहे. तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यापासून हीना सतत सोशल मीडियावर तिच्या उपचारांचे अपडेट्स देत आहे. चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. हीना अत्यंत सकारात्मक पद्धतीने, अतिशय खंबीर होऊन या उपचारांना सामोरी जातेय. अत्यंत वेदनादायी केमोथेरपी तिने नुकतीच पूर्ण केली. त्यासाठी गमवावे लागलेले सुंदर लांबसडक केस, केमोच्या दुष्परिणामांमुळे त्वचा, डोळे यांना झालेले अपाय हे सर्व हीना शांतपणे, सकात्मकतेने सहन करतेय. आता हीनाने हॉस्पिटलमधील आणखी एक फोटो शेअर केला आहे. लवकरच काळोख संपणार, प्रकाश पसरणार, त्या दिशेने एका वेळी एकच पाऊल…कृतज्ञता कृतज्ञता कृतज्ञता... असे सुंदर कॅप्शन हीनाने या फोटोला दिल्यामुळे हीनाबरोबरच तिच्या चाहत्यांना सकारात्मक संदेश मिळाला आहे. हीना लवकरच या आजारातून पूर्णपणे बरी होऊन बाहेर पडेल, असा विश्वास आता सर्वांना वाटू लागला आहे.
फोटोत दिसत आहे की, हीना रुग्णालयातील खोलीबाहेर असलेल्या जागेत चालत आहे. येथे ती कॅमेऱ्याकडे पाठ करून चालली आहे. हीनाच्या हातात एक पाऊच बॅग व काही गोल आकाराच्या बाटल्या आहेत. त्यावरून ती किती वेदना सहन करत असेल याचा अंदाज येत आहे. मात्र, हीनाने धीरोदात्तपणे या आजाराशी दोन हात केले आहेत. उपचारांदरम्यान हीनाने कामावर परिणाम होऊ दिला नाही. काही दिवसांपूर्वीच तिने एका फॅशन शोमध्ये ब्रायडल विअरमध्ये रॅम्प वॉकसुद्धा केला होता. काही दिवसांपूर्वीच तिने मुंबईतीaल एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘बिग बॉस १८’च्या एका ‘रविवार का वार’मध्ये हीना गेल्या महिन्यात झळकली होती. त्यावेळी सलमान खानने तिचे शेर खान म्हणत स्वागत केले होते.
दरम्यान, हीनाच्या फोटोवर 'असेच तुला कोणी शेर खान नाही म्हणत.' 'आमच्या सर्वांची प्रार्थना तुझ्याबरोबर आहे.' 'तू लवकर बरी होशील आणि तुला लवकर बरे व्हावे लागेल.' 'आमच्या सर्वांच्या प्रार्थना तुझ्याबरोबर आहेत.' 'तुला पाहून अनेक व्यक्ती जगणं शिकत आहेत,' अशा सकारात्मक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.