गोष्ट पहिल्या विधवा पुनर्विवाहाची

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-12-07 16:39:53

ईश्वरचंद्र विद्यासागर यांना एकदा त्यांच्या आईने विचारले, तू एवढे मोठमोठे ग्रंथ वाचतोस; परंतु या नऊ वर्षांच्या चिमुरड्या विधवेचे दुर्भाग्य ज्यामुळे नष्ट होईल असे एखादे शास्त्र तुला माहीत नाही का? ईश्वरचंद्रांनी त्या मुलीकडे पाहिले. त्यांना तिची किव आली. त्यानंतर त्यांनी महत्प्रयासाने विधवा विवाहासंबंधीचे शास्त्रार्थ शोधले आणि विधवांना क्रूरपणे वागवण्याच्या दुष्ट रूढीविरुद्ध लढा आरंभला. त्यांच्यामुळेच १८५६ रोजी हिंदू विधवांच्या पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली. हा कायदा २६ जुलै १८५६ रोजी लागू करण्यात आला. पाच महिन्यात ७ डिसेंबर १८५६ रोजी देशात पहिला विधवा पुनर्विवाह पार पडला. विद्यासागर यांचा बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक भर होता. म्हणूनच त्यांनी स्वत:च्या मुलाचेही लग्न एका विधवेशी लावून दिले. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन करणारे विद्यासागर यांनी मात्र बहुपत्नी प्रथा व बालविवाह प्रथेला विरोध केला.

आजच्याच दिवशी म्हणजे ७ डिसेंबर १८५६ रोजी देशात प्रथम विधवा पुनर्विवाह कोलकाता येथे झाला होता. भारतात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मुलींची लग्ने कमी वयात होत असत. परिणामी अल्पवयीन वयात विधवा होण्याचे प्रमाण जास्त होते. हे चक्र संपविण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांनी पहिल्यांदा कायदा झाला आणि त्यांनी एका विधवेशी लग्न केले. त्यावेळी कोलकाता शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. कारण काही दिवसांपूर्वी विवाह पुनर्विवाह कायदा झाला होता. आता या कायद्याच्या आधारे पहिले लग्न कोलकात्यात होणार होते. विधवा ही दहा वर्षांची निष्पाप कलामती होती आणि वर श्रीचंद्र विद्यारत्न होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या राज कृष्ण बंदोपाध्याय यांच्या घरी हा विवाह होत होता. 
               रस्त्यावर जमलेला जनसमुदाय चिडला होता, काही जण चकित, तर काही नाराज झाले होते. पालखीतून वधू व वराला आणल्यावर परिस्थिती हाताळणे खरोखर कठीण झाले. पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. काही निवडक लोकच सुकीस स्ट्रीटमध्ये प्रवेश करू शकत होते. ज्या मार्गाने पालखी आणण्यात आली, त्या संपूर्ण मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त होता. त्याचवेळी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नेतृत्वाखाली कोलकात्याचे काही प्रभावशाली लोक देखील ही व्यवस्था मजबूत करण्यासाठी उपस्थित होते. ज्यांनी आपला समाज वाईट प्रथा आणि बंधनांपासून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांमुळे २६ जुलै १८५६ रोजी हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा १८५६ होऊ शकला. यानंतर हिंदू विधवांचे पुनर्विवाह कायदेशीर करण्यात आले. हा कायदा स्वतः लॉर्ड डलहौसी यांनी तयार केला होता. नंतर तो लॉर्ड कॅनिंगने पारित केला होता. मात्र, त्याच्या मार्गात अनेक अडथळे आले. याआधी संमत झालेला मोठा सामाजिक सुधारणा कायदा म्हणजे सतीप्रथेवर बंदी घालणे. दहा वर्षांची कलामती काही दिवसांपूर्वी विधवा झाली होती. तिच्याशी लग्न करणारा तरुण श्रीचंद्र विद्यारत्न हा एका संस्कृत महाविद्यालयात शिक्षक होता. विद्यासागरचा सहकारी होता.
            वर पंडित श्रीचंद्र विद्यारत्न हा त्यांच्या मित्राचा तरुण मुलगा होता. २४ परगणा येथे राहत होता. वधू कलामती देवी ही विधवा मुलगी होती, जी मूळची बर्दवानमधील पलासाडंगा गावची होती. २७ नोव्हेंबर १८५६ ही पहिली लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, सामाजिक भीतीमुळे श्रीचंद्रने मागे हटण्यास सुरुवात केली. या प्रकरणात श्रीचंद्राची आई लक्ष्मीमणी देवी ठाम होती की, तिने मुलाचे लग्न एका विधवेशी करावे. ती स्वतः विधवा होती. मग मित्र आणि विद्यासागर यांनी भीती दूर केली. बऱ्याचअंशी त्याच्या मित्रांनीही वर श्रीचंद्राची भीती दूर केली. विशेषत: विद्यासागर यांनी त्यांना खूप बळ दिले. ही गोष्ट जेव्हा कोलकाता आणि बंगालमध्ये कळू लागली तेव्हा त्याचा तीव्र विरोध सुरू झाला. त्यानंतर राज कृष्ण बंदोपाध्याय पुढे आले, ज्यांनी आपल्या घरी लग्नाची संपूर्ण व्यवस्था करण्याची घोषणा केली. विद्यासागर यांनी वधूला स्वतःच्या हाताने विणलेल्या साड्या आणि दागिने भेट दिले आणि लग्नाचा इतर खर्चही स्वतः उचलला. पुढे विद्यासागर यांनी अशा अनेक विवाहांचा खर्च स्वतः उचलला. त्यामुळे त्याच्यावर कर्जही खूप झाले. पहिल्या विधवा विवाहानंतर बंगालमधील हुगळी आणि मिदिनापूर येथे असेच विवाह झाले. सुरुवातीला हे खूप कठीण होते. पण हळूहळू जोर धरला.
              ब्राह्मो समाजाचे आघाडीचे नेते शिवनाथ शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार हा कायदा लागू होण्याच्या दोन दशकांपूर्वी दक्षिणरंजन मुखोपाध्याय यांनी बर्दवानची राणी आणि राजा तेजचंद्र यांची विधवा वसंता कुमारी यांच्याशी विवाह केला होता. पण कायदा लागू झाला नव्हता म्हणून तो स्वीकारला गेला नाही. मुखोपाध्याय हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी जातीपलीकडे जाऊन लग्न केले म्हणूनही हे लग्न खास होते. या लग्नाचे साक्षीदार स्वतः कोलकाता पोलीस दंडाधिकारी बनले. पण यामुळे कोलकाता आणि बंगालमध्ये इतका संताप निर्माण झाला की, नवविवाहित जोडप्याला लखनौत आश्रय घ्यावा लागला. तेव्हा बंगालमध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त होते. याआधी जेव्हा पालकांनी त्यांच्या लहान विधवा मुलींचे पुनर्विवाह करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. त्याकाळी बंगालमध्ये आठ-दहा वर्षांच्या मुलींची लग्ने अनेक वेळा ६० ते ७० वयोगटातील पुरुषांशी लावून दिली जायची. त्यांच्या मृत्यूनंतर या तरुण विधवेची अवस्था अतिशय दयनीय होत होती. अशा परिस्थितीत विद्यासागर यांनी विधवांचे पुनर्विवाह कायदेशीर ठेवण्याचा पवित्रा घेतला. यासाठी त्यांनी धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला. पराशर संहितेत त्यांना जे हवे होते ते मिळाले. म्हणजेच विधवांचे विवाह शास्त्रानुसार होते. मात्र, हिंदू समाजाकडून त्याला प्रचंड विरोध झाला. पण अखेर हे विधेयक मंजूर झाले. कायदा होऊनही विद्यासागर यांचे काम संपले नव्हते. जोपर्यंत असे विवाह सुरू होत नाहीत तोपर्यंत असे कायदे करण्यात काही अर्थ नाही, असे त्यांचे मत होते.

-चंद्रशेखर शिंपी ( ९६८९५३५७३८ )