श्री खंडोबाचे नवरात्र

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-12-07 16:44:13

चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी, 
मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी... 
   दि,२ डिसेंबरपासून श्री खंडोबाच्या नवरात्रास प्रारंभ झाला. आज चंपाषष्टीला त्याची सांगता होत आहे.   श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी. या दिवशी खंडोबा देवाच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून, सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत. म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेंत भंडारा फार महत्त्वाचा आहे.
           भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुळधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य समर्पित करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण ‘‘सदानंदाचा यळकोट’’ किंवा ‘‘यळकोट यळकोट... जय मल्हार..’’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. रविवार हा खंडोबाचा वार मानण्यात आला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्र पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणाई यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसाचा जन्म दिवस आहे, तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा देवाच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील खंडोबाची बारा प्रसिद्ध स्थाने:
महाराष्ट्र:१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी, २) निमगाव ३) पाली-पेंबर, सातारा, ४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद), ५) शेंगुड (अहिल्यानगर), ६) सातारे (छत्रपती संभाजीनगर), ७) चंदनपुरी, मालेगाव, नाशिक कर्नाटक:१) मैलारपूर-पेंबर (बिदर), २) मंगसूल्ली (बेळगाव), ३) मैलारलिंग (धारवाड), ४) देवरगुडू (धारवाड), ५) मण्मैलार (बल्लाळी).
        खंडोबाचे नवरात्र: खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणी-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, तसेच (म्हाळसा देवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले. हा श्रीशंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून खंडोबा. खंडोबाच्या हातांतील वस्तू: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरू व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानाप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो.
खंडोबाची पूजा: खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसविणार्‍याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे. खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभातच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. देवास स्नान घालून पूजा करावी. कापूर-चंदनमिश्रित पाणी एका भाड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना सुगंधी फुले, गुलाल व भंडार वाहावा. भंडारा लावलेले तांदळाचे दाणे वाहावेत. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी फुले अर्पण करावीत. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात. देवाजवळ अखंड तेला-तुपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. 
      आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात. सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी माहात्म्याचे, मल्हारी स्तोत्राचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते. महानैवेद्य: सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो.
         दिवटी-बुधली : दिवटी- बुधली याचे महत्त्व असे आहे की, मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता, तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याची, पितळाची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत (विझवावी.) करावी. व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलित प्रथा आहेत.
(सोशल मीडियावरून साभार)