गृहमंत्रिपद फडणवीसांकडेच राहणार
तिढा सुटला; केंद्राशी समन्वयाचे दिले कारण
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-07 17:12:22

मुंबई : मुख्यमंत्री भले तुम्ही व्हा पण निदान मला गृहमंत्रिपद तरी द्या या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हटून बसले होते . शपथविधी सोहळ्यातही ते सहभागी होतात की नाही इथपत त्यांची नाराजी तीव्र होती. कसबसे त्यांची मनधरणी करुन त्यांना शपथविधी सोहळ्यात सहभागी व्हायला भाग पाडले गेले. त्याच गृहमंत्रिपदाच्या वादावरुन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येतो. त्यामुळे गृहमंत्रालय हे आमच्याकडे असावे, भारतीय जनता पार्टीकडे असावे असे मला वाटते असे सांगून ते या पदाची सुत्रे त्यांच्याकडेच कायम ठेवणार हे आता स्पष्ट झाले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची या वादासंदर्भातील भूमिका मांडली आहे. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितले आहे का? असा प्रश्न विचारला असता , त्यांनी असं कुठलेही मंत्रीपद मागितलेले नाही. त्यांनी फक्त तीन ते चार खात्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.असे सांगून आम्ही तिघेही पक्ष एकत्रच आहोत. मात्र, गृहमंत्रीपद सांभाळत असताना केंद्र सरकारशी, केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो. या राज्यात नक्षलवादाची समस्या आहे. मुंबईसारखे मोठे शहर सांभाळायचे आहे. ही एक प्रकारे देशाची राजधानी आहे. माझा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी नेहमी संपर्क असतो. आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय राखतो. मी केंद्रीय गृह मंत्रालयाशी चांगल्या प्रकारे समन्वय साधू शकतो. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार देखील ते करू शकतात. परंतु, तरीदेखील हे खाते भाजपाकडेच राहावे असे मला वाटते असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
मागील १० पैकी ७.५ वर्षे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच आहे आणि आताही तेच या पदावर कायम राहतील असे चित्र आहे.