भगवे, गुलाबी फेटे, जय श्रीराम नारे, संस्कृतमधून शपथ

विशेष अधिवेशनासाठी विधिमंडळ सभागृहात आमदारांचा उत्साह

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-07 17:54:47

मुंबई :- भाजपा आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदारांनी भगव्या रंगाचे फेटे घालून  तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी गुलाबी रंगाच्या फेट्यांमध्ये विधिमंडळ सभागृहात उपस्थिती लावत शपथ घेतली. त्यामुळे आता फेट्यांच्या रंगांवरुन महायुती घटकपक्षात फॅशन शो सुरु झाल्याचे चित्र होते. तसेच या शपथविधीप्रसंगी काहींनी जय श्रीरामचे नारे दिले तर काहींनी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसारख्या नेत्यांचा जयजयकार देखील काहींनी केला. एकूणच प्रसंग काहीही असो, त्याला इव्हेंटचे रुप देण्याचा नवीन ट्रेंड महायुती सरकार देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

लाडक्या बहिणींमुळे हा विजय शक्य झाला म्हणून, गुलाबी रंग हा नारी शक्तीचे प्रतीक मानला जातो म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी गुलाबी रंगाचे फेटे घातले होते. हे फेटे चांगलेच चर्चेत राहिले. फडणवीस यांनी शपथविधीसाठी देखील गुलाबी रंगाचे जॅकेट घातले होते. 

दरम्यान, यावेळी हिंदूत्व, परंपरा, संस्कृती, भाषा यांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न काही आमदारांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे भाजपाचे  आमदार गिरीश महाजन , नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे,  भाजपाचेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, सांगलीचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी  संस्कृतमध्येच आमदारकीची शपथ घेतली.  

आमदारांचा शपथविधी आणि विधानसभेच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी विशेष अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक पावित्रा घेतला. याचबरोबर त्यांनी आज आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवसेनेचे  उद्धव ठाकरे  गटाचे अदित्य ठाकरे यांनीही आज शपथ घेतली नाही.