भारताची अवस्था नाजूक ; पाच बाद १२८ धावा
पिंक बॉल कसोटी ; कांगारुंची पकड मजबूत
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-07 18:52:32
ॲडिलेड :- पर्थ कसोटीत झालेल्या दारुण पराभवाचा वचपा काढायचेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून ॲडिलेड मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने त्यांचा हिसका दाखवत पिंक बॉल कसोटीवर त्यांची पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी भारताच्या बलाढ्य फलंदाजीचा कणा मोडून काढत भारताची अवस्था पाच बाद १२८ धावा अशी नाजूक केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पंत २८ धावा करून खेळत आहे तर नितीश कुमार १५ धावा करून नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाकडे अद्याप २९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघ आता किती धावांची आघाडी मिळवणार यावरच सारे अवलंबून आहे.
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने १ बाद ८६ धावांवरून आपला डाव सुरु केला. ट्रॅव्हिस हेडच्या १४० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ३३७ धावांचा डोंगर उभारला. हेडला मिळालेल्या दोन जीवदानाचा चांगलाच फायदा त्याने घेतला. एकदा सिराजकडून तर दुसऱ्यांदा पंतकडून त्याचा झेल सुटला. हेडच्या घणाघाती खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत १५७ धावांची चांगली आघाडी मिळवली. गुलाबी चेंडूच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांच्या मिळून १४ विकेट पडल्या. दुसऱ्या डावात भारताची आघाडीची फळी पुन्हा कांगारुंच्या भेदक माऱ्यापुढे टिकाव धरु शकली नाही. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली आणि शुबमन गिल पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. तर रोहित शर्मानेही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना निराश केले. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला आहे.
दरम्यान, पत्नीच्या बाळंतपणासाठी पहिल्या कसोटीत सहभागी न झालेला कर्णधार राेहित शर्मा या कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात रोहित ऐवजी के.एल.राहुल सलामीस उतरला होता. दुसऱ्या डावात राहुलने चांगली खेळी केली होती. म्हणून त्याला कोणत्याही डिर्स्टबन्स नको म्हणून रोहित या कसोटीत सहाव्या क्रमांकावर खेळला. मात्र मधल्या फळीत येऊनही रोहितची बॅट तळपली नाहीच. तसेच राहुल देखील फार काही करु शकला नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पुन्हा ओपनिंग करण्यासाठी येऊ शकतो.