मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

जिल्ह्यात १४ आमदार महायुतीचे; अनेकांना ‘डोहाळे’

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-09 12:25:15

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागून आहे. नाशिक जिल्ह्याने महायुतीच्या पंधरापैकी १४ आमदारांवर गुलाल उधळत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवले. त्यामुळे नाशिकचे किती चेहरे संभाव्य मंत्रिमंडळात झळकणार व कोणाला मलाईदार खाते मिळणार की दुय्यम खात्यावर बोळवण होणार, याकडे लक्ष लागून आहे. यासाठी अनेकांनी मुंबईतच तळ ठोकला असून, मंत्रिपदाची शपथ घेऊनच परतणार, असा जणू चंगच बांधला असल्याचे समजते.
      नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला आहे. लवकरच नवीन अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली महायुती बहुमत सिद्ध करेल व त्यानंतर नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सत्तास्थापनेचे रुसवे-फुगवे दूर झाले असून, आता मंत्रिपद वाटपाचा फाॅर्म्युला अंतिम टप्प्यात असून, कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. जिल्ह्यात तिन्ही पक्षांचे मिळून १४ आमदार असून, अजित पवार गट मोठा भाऊ आहे. 
          ज्येष्ठ नेते व ओबीसी नेतृत्व छगन भुजबळ, आदिवासी मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार निवडलेले नरहरी झिरवाळ यांच्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा असून, सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांचे नावही चर्चेत असल्याचे समजते, तर त्याखालोखाल भाजपचे पाच आमदार असून, विजयाची हॅट्‌ट्रिक करणारे चांदवड- देवळा मतदारसंघाचे डाॅ. राहुल आहेर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता आहे. तर प्रा. देवयानी फरांदे यांचे नावही राज्यमंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचे समजते. शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार असून, त्यापैकी एकाला संधी मिळेल, अशी शक्यता आहे.  नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनीही मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून, ते मुंबईत तळ ठोकून असल्याचे बोलले जाते. मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? याबाबत राजकीय  वर्तुळात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

पालकमंत्रिपदावरून शीतयुद्ध 

नाशिक जिल्ह्याचे पालकत्व कोण सांभाळेल, यावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांत शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे, तर भाजपकडून गिरीश महाजन यांचे नाव समोर येत आहे. आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा असल्याने भाजप पालकमंत्रिपद सोडणार नाही असे समजते.