सुरभी हांडे पुन्हा साकारणार ‘म्हाळसा’
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-09 14:29:27

जय मल्हार या मालिकेत म्हाळसाची भूमिका साकारलेल्या सुरभी हांडेला पुन्हा एकदा म्हाळसाचीच भूमिका साकारायला मिळते आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्वितच वेगळा ठरत आहे. याच मालिकेत तुळजाला पाठिंबा देणारी म्हाळसा सुरभी साकारतेय. तब्बल १० वर्षांनी ती ही भूमिका पुन्हा साकारणार आहे. आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. 'आई तुळजाभवानी' मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल. या भूमिकेबद्दल सुरभीने समाधान व्यक्त केले आहे. १० वर्षांनी म्हाळसा आता परत येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होते. आता 'आई तुळजाभवानी' या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे, असे सुरभीने सांगितले आहे.