बॅट, हातमोजे, इतर साहित्याचा आदर करा
सचिनचा युवा खेळाडूंना मोलाचा सल्ला
Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-09 14:39:37
मुंबई: सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक उद्घाटनानंतर विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ या दोन खेळाडूंची चर्चा चांगलीच रंगली आहे. गुणवत्ता असूनही शिस्त, संयम, सराव, सातत्य, नम्रता या गोष्टी जर तुम्ही बाजूला सारुन अति आत्मविश्वास बाळगला तर त्याची परिणीती तुमच्या अपयशातच होते अशा आशयाचा मजकूर या दोघांबद्दल ओसांडून वाहतोय. दोघे कसे त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे खेळाच्या पटलावरुन अलगद बाजूला सारले गेले आणि सचिन कसा क्रिकेट विश्वातला ध्रुव तारा बनला असेही अनेकांनी लिहलेय. खुद्द सचिनने या सोहळ्यात त्याच्या यशाचे श्रेय आचरेकर सरांच्या प्रशिक्षणाला दिले. पण त्याचबरोबर सचिनने अनेक रंजक किस्सेही यावेळी सांगितले. क्रिकेटचे संस्कार आचरेकर सरांनी कसे त्याच्यावर केले, याविषयी तो बोलला. सरांनी आम्हाला आमच्या किटचा आदर करायला शिकवले. निवृत्त झाल्यापासून मी हे बऱ्याच खेळाडूंना सांगत आलो आहे आणि मी अनेक खेळाडूंमध्ये हे पाहतो. ते आऊट झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परत येतात. निघून जातात, बॅट फेकून देतात. या बॅटमुळेच तुम्ही या ड्रेसिंग रूममध्ये बसला आहात, याचे भान त्यांना राहत नाही. तो पुढे म्हणाला की, " तरुण क्रिकेटपटूंना मी सांगू इच्छितो, की कृपया लक्षात ठेवा, तुमची किट कधीही फेकू नका, मग ती बॅट असो, हातमोजे असो किंवा इतर काहीही असो. त्याचा नेहमी आदर करा. सरांनी आम्हाला लहानपणापासून दिलेले प्रशिक्षण होते आणि आम्ही त्यांचा संदेश त्यांच्याप्रमाणेच देऊ शकतो काय, मला माहित नाही. आपल्यापैकी कोणीही त्याच्या पातळीपर्यंत पोहोचू शकत नाही.