जुनागढमध्ये रस्ता अपघातात ७ जणांचा मृत्यू
दोन कारची झाली समोरासमोर धडक
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-09 17:55:46

जुनागढ- जुनागढ येथे रस्ता अपघातातात सात जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने एकाच कारमधील पाचही जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी दुसऱ्या कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांना या अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे या अपघातात एकूण ७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेली कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या कारला धडकली. या धडकेनंतर दोन्ही कारचा चक्काचूर झाला.
जेतपूर-वेरावळ महामार्गावरील भांडुरी गावाजवळ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कारमध्ये धडक झाली. भांडुरीजवळील कृष्णा हॉटेलजवळ हा अपघात झाला. या अपघातात परीक्षेला जाणाऱ्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघाताची एफएसएल पथकाकडून चौकशी करण्यात येणार आहे. या अपघातात ज्या पाच जणांना जीव गमवावा लागला ते विद्यार्थी होते. वीणू देवशी वाला, निकुल विक्रम कुवाडिया, रजनीकांत मुगरा, राजू कानजी, धरम विजय गोरे, अक्षर दवे, राजू कांजी भुतान अशी मृतांची नावे आहेत.
याआधी 19 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील भरूचमध्ये कार पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात दोन मुले आणि दोन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, इको कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. भरूचमधील जंबुसर-आमोद रोडवर रात्री उशिरा हा अपघात झाला. ही टक्कर इतकी भीषण होती की, इको कारमधून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला होता.