संविधान रक्षणासाठी काका-पुतण्याने एकत्र यावे

हेमंत टकलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-12 14:16:06

नवी दिल्ली:- मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी अजित पवारांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडला. विधानसभा निवडणूकीत त्यांच्या पक्षाला चांगले यश देखील मिळाले. त्यामुळे शरद पवार आता खऱ्या अर्थाने एकाकी पडले अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दोघांची दिलजमाई व्हायला हवी अशी देखील कुजबूज होऊ लागली आहे.          

याचे ठळक उदाहरण म्हणजे हेमंत टकले यांनी केलेले वक्तव्य.  मधल्या काळात  शरद पवार यांचा पक्ष फुटला.  भेदी हा घरचाच होता. पण तरी शरद पवार मागे हटले नाहीत. लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. संविधान वाचवायचे असेल, न्याय व्यवस्था टिकवायची असेल तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी एकत्र यायला हवे, असे हेमंत टकले यांनी म्हटले आहे.        

 हेमंत टकले हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोषाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला नक्कीच गांभीर्य आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांना सोडून गेलात, पण पद मिळाले नाहीच. मग त्यापेक्षा आपल्या पक्षात पुन्हा सामावून जात पक्षाचा, कुटुंबाचा, राज्याचा नावलौकिक अजित पवारांना सांभाळता येईल, अशी भावना या वक्तव्यामागे हेमंत टकले यांची होती. अजित पवार हे शरद पवारांच्या तालमीत, बारामतीच्याच मूशीत तयार झाले आहेत. त्यामुळे काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार त्यांची राजकीय भूमिका बदलणार का? अजित पवारांना पक्षाध्यक्ष बनवणार का? पुन्हा जोमाने पक्ष उभारणार का? भाजपला खिंडीत गाठणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकणार आहेत.