गाबा कसोटीवर पावसाचे सावट

भारतासाठी डब्ल्युटीसी अंतिम फेरी गाठणे होणार अवघड

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-12 14:32:02

गाबा:- ॲडिलेड कसोटीत दारुण पराभव झाल्यानंतर आता भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचण्याचे स्वप्न आणखीनच धुसर होत चालले आहे. कारण  बॉर्डर -गावस्कर कसोटी मालिकेतील तिसरा सामना गाबा मैदानावर खेळवला जाणार असून या कसोटीवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे पावसाचा हा व्यत्यय भारतासाठी अंतिम फेरीच्या प्रवेशासाठीचा मोठा व्यत्यय ठरण्याची शक्यता आहे. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी १४ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे आणि सामन्याच्या पाचही दिवस पावसाची शक्यता आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, सामन्याच्या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त ८८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या आणि चौथ्या दिवशीही पावसाची ४० टक्क्यांहून अधिक शक्यता आहे.   जर पावसामुळे गाबा कसोटी अनिर्णित राहिली तर त्याचा भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीच्या प्रवेशावर परिणाम नक्कीच होणार हे आता स्पष्ट आहे. 

भारतीय संघ सध्या ५७.२९ टक्के गुणांसह  डब्ल्युटीसी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आहेत ज्यांचे गुण अनुक्रमे ६३.३३ आणि ६०.७१ टक्के आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरीही भारत डब्ल्युटीसी  फायनलमध्ये पोहोचू शकतो. मात्र गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताला  पुढील दोन कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत.  ही मालिका भारताने   ३-१ ने जिंकली, तरच त्यांना अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळेल. 

गाबा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर, भारताने पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक गमावला, तर मालिका २-२ अशी संपेल. या स्थितीत भारतीय संघाला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंका संघ या मालिकेत विजयी झाला तरच भारतासाठी आशा निर्माण होणार आहेत.