लोकशाही विकत घेण्याचा भाजपचा प्रयत्न
पटोलेंनी खोडून काढला बावनकुळेंचा दावा
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-12 15:00:05

मुंबई : २००८ मध्ये भाजपचे सरकार स्थापण्यासाठी बी. एस. येडियुरप्पा यांनी पैसे देऊन आमदार विकत घेतले होते. यालाच ऑपरेशन लोटस असे गोंडस नाव देण्यात आले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेंतर्गत इतिहास रचला. त्यातच मविआ’तील काही खासदार-आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याने राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ची जोरदार चर्चा आहे. मात्र, हा तर भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांचा दावा खोडून काढला आहे.
बावनकुळे यांच्या या माहितीत अर्थ नाही. शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपयांची कर्जे दिली पाहिजे, नोकरभरती कशी करणार, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा नागपूरच्या अधिवेशनात होणे अपेक्षित आहे. यासाठी नागपूर अधिवेशन कमीत कमी एक महिन्याचे असावे अशी मागणी केली होती, पण भाजपा युती सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका देखील पटोले यांनी केली आहे.
विधानसभा निवडणूकीत ना भूतो ना भविष्यती बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने आता निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींंवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, राजकीय तर्क-वितर्क, अफवांना पुन्हा पेव फुटू लागले आहेत. महाविकास आघाडीचे पाच-सहा खासदार भाजपच्या संपर्कात असून त्यांना केंद्रात मंत्रीपदे किंवा अन्य जबाबदाऱ्या देण्याचे आश्वासन मिळाल्यास ते राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्यास तयार आहेत. त्यांचे स्वागत आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. बावनकुळे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी खा.संजय राऊत यांनीही बाह्या सरसावल्या असून भाजप कोणतेही ‘ऑपरेशन लोटस’ राबवू शकते. त्यांच्याकडे अमाप पैसा व यंत्रणा आहे. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे माणसे फोडली. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी माणसे का पळून गेली, हे दोघेही भीतीपोटीचे गेले. हे ‘ऑपरेशन लोटस’ नव्हते तर ‘ऑपरेशन डर’ होते. ते घाबरून तिकडे गेले, अशी टीका राऊत यांनी केली.