ठरलं ! मंत्रीमंडळ विस्तारासाठी आता १४ डिसेंबरचा मुहूर्त
नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-12 16:14:01

मुंबई:- महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी व एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दिमाखदार सोहळ्यात शपथ घेतली. त्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आधी मुख्यमंत्रीपदावरुन, गृहमंत्रीपदावरुन बरेच नाराजी नाट्य, चर्चा, खलबते महायुतीत पाहायला मिळाली होती. साहजिकच मंत्री मंडळ विस्तार करतानाही ते होणारच हे अपेक्षित होते. तीन पक्ष्यांच्या ज्येष्ठ-श्रेष्ठांची मर्जी राखत, मानअपमान सांभाळत ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तारासाठीही महायुतीने बराच अवधी घेतला आहे. आता मात्र ही प्रतीक्षा संपली असून मंत्रीमंडळ विस्तारासाठी आता १४ डिसेंबरचा मुहूर्त ठरला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली . यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा देखील यावेळी उपस्थित होते. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्यामुळे भाजपला २५ मंत्रिपदे हवी अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात महायुतीचा महत्वाचा घटक पक्ष शिवसेनेला ( शिंदे गट ) १३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ( अजित पवार गट ) ९ ते १० मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रीमंडळातून जुन्या, ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या विस्ताराकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शनिवारी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
आमदार अब्दुल सत्तार, डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही सत्तेत सामील करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. शिवसेनेतील काही आमदारांनीही सत्तार यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. शिंदे मात्र सावंत यांच्या समावेशाबाबत आग्रही आहेत. महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या जुन्या चेहऱ्यांना मंत्रीमंडळात संधी देण्याऐवजी नव्या चेहऱ्यांचा समावेश करावा, अशी चर्चा शिवसेना आमदारांमध्ये आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आग्रही असल्याचीही चर्चा आहे.