महिला सन्मान योजनेची केजरीवालांकडून घोषणा

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची पुनरावृत्ती

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-12 16:51:00

नवी दिल्ली:- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद महायुतीला लाभला. या योजनेमुळेच महायुती सरकारला ऐतिहासिक बहुमत मिळाले. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये देखील या योजनेचे परिणाम मतदानावर पाहायला मिळाले होते. या सर्वच घडामोडींचा अभ्यास अरविंद केजरीवाल यांनी केला असून लवकरच पुढील वर्षात होणाऱ्या  दिल्ली विधानभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील  लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक महिलेस दरमहा १००० रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री  केजरीवाल यांनी केली आहे. महिला सन्मान योजना असे या योजनेचे नाव असेल.          

दिल्ली विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेशची पुनरावृत्ती भाजपने करण्याआधीच केजरीवाल यांनीच काही महत्वाकांक्षी आणि मोठ्या योजनांची घोषणा केली. त्यामध्ये, दिल्ली सरकारच्या कॅबिनेटने आज महिला सन्मान योजनेला मंजुरी दिली असून या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १००० रुपये दिले जाणार आहेत.  दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास ही रक्कम वाढून २१०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले आहे.  त्यामुळे आता दिल्ली विधानसभा निवडणूकीतही लाडक्या बहिणींचा बोलबाला दिसून येतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.          

 दरम्यान,केजरीवाल सरकारने केलेल्या महत्वाच्या घाेषणांपैकी एक म्हणजे  दिल्लीतील सर्वच रिक्षाचालकांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.  रिक्षा चालकांच्या मुलींच्या लग्नासाठी, रिक्षा चालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही पुढाकार घेतला जाणार आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी २०२५ मध्ये संपत आहे.   पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे विधानसभेच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.