डी. गुकेश ६४ घरांचा सर्वात तरुण ‘राजा’

भारताचा दुसरा विश्वविजेता; कास्पोरोव्हचाही विक्रम मोडला

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-13 12:27:05

मुंबई : भारताचा डी. गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँड मास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा किताब पटकावला. विश्वनाथन आनंदनंतर गुकेश आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. गुकेश हा केवळ अठरा वर्षांचा असून, तो जगातील सर्वांत तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने गॅरी कास्पोरोव्ह याचा विक्रमही मोडला आहे. 
       गुकेशच्या आधी विश्वनाथन आनंद २०१२ मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. गुकेशने याआधी वयाच्या १७ व्या वर्षी फिडे ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. आता चीनच्या लिरेनचा १४ डावांनंतर ७.५-६.५ अशा गुणांनी पराभव केला. गुकेश यांचे संपूर्ण नाव डोमराजू गुकेश असून, तो चेन्नईचा रहिवासी आहे. गुकेशचा जन्म ७ मे २००६ला चेन्नईत झाला. त्याने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत. तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूटर आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेशचे वडील डॉक्टर असून, आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.