दिल्लीतील सहा शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी
‘ आप ’ ने साधला शहांवर निशाणा
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-13 12:43:49

नवी दिल्ली:- दिल्लीतील सहा शाळांना बॉम्बच्या बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.शुक्रवारी पहाटे ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा परिसरात शोध मोहिम सुरू केली.
पश्चिम विहार भाटनगर इंटरनॅशनल स्कूल, श्री निवास पुरी येथील केंब्रिज स्कूल आणि कैलाश पूर्व येथील डीपीएस अमर कॉलनी या शाळांमधून धमकीच्या ईमेलबाबत फोन आल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकार्याने दिली. तसेच अग्निशमन विभाग, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथके, श्वान पथकांसह या शाळांमध्ये पोहोचले आहेत आणि तपासणी करत आहेत.
ई-मेलद्वारे धमकी मिळालेल्या शाळांमध्ये डीपीएस ईस्ट ऑफ कैलास, सलवान स्कूल, मॉडर्न स्कूल आणि केंब्रिज स्कूल या शाळांचा समावेश आहे. ९ डिसेंबर रोजीदेखील जवळपास ४० शाळांना अशीच धमकी दिली होती. गेल्या आठ महिन्यात दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या संस्थांना ज्यामध्ये शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि विमानतळ याचा समावेश आहे यांना बॉम्बच्या अनेक धमक्या मिळाल्या आहेत, पण तपासानंतर या शेवटी खोट्या असल्याचे समोर आले आहे.
शहांवर साधला निशाणा
या धमक्या मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप झाले नसते तर नवल. ‘ आप ‘ ने केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधत दिल्लीत गुन्हेगारी शिखरावर पोहचली आहे. अमित शहा या गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई करणार नाही हे माहित असल्यामुळेच हे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोपही ‘ आप‘ ने केला आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे अत्यंत गंभीर असून काळजी वाढवणारे आहे. हे असंच सुरू राहिले तर मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होईल असे म्हटले आहे.