शरद पवार गटाचे पाच खासदार फोडा; भाजपाचा आदेश

संजय राऊत यांनी वर्तवली राजकीय भूकंपाची शक्यता

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-13 15:13:03

मुंबई:-  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस गाजला तो राजकीय तर्क-वितर्कांनी.  पण आता पुन्हा राजकीय भूकंपाचे हादरे या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधून बसायला लागले आहेत. 

          उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी सहकुटुंब तसेच काही मोठ्या नेत्यांसह घेतलेली पवारांची भेट या वाढदिवशी चर्चेत राहिली.  काका-पुतणे एकत्र येता की काय? असा प्रथमदर्शनी अंदाज बांधला जात होता. पण आता पडद्यामागच्या हालचाली हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत.   उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी  शरद पवार गटातील एक  ज्येष्ठ नेते व भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक झाल्याचा गौप्यस्फोट  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत   यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.  त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याने या बातमीत तथ्य असल्याचे बोलले जात आहे. 

       खासदार संजय राऊत यांनी या राजकीय भूकंपाबाबत सांगितले, की   अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. कारण मंत्रीपदाचा केंद्रात फॉर्म्युला ठरलेला आहे. साधारण सहा खासदारामागे एक मंत्रीपद असते. प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगण्यात आले आहे की, तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या. तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मला मंत्री पद देऊ. 

          पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84 व्या वर्षी जीवाचे रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचे पक्ष सोडत असतील तर फुटणाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे. ते कोणीही असो, फुटणाऱ्यांना शरम वाटली आहे, जर येत्या काळात शरद पवार गटाचे खासदार भाजपच्या सांगण्यावरुन फुटले तर महाराष्ट्राशी ती बेईमानी ठरेल असेही खडे बोल राऊत यांनी सुनावले आहे.  

          दरम्यान, महायुती सरकारमध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद तर सोडाच अन्य महत्वाच्या खात्यांपासून देखील वंचित ठेवण्यात आले आहे. निदान दिल्लीत त्यांना मंत्रीपदाचे लालूच दाखवून त्यांची नाराजी दूर करण्याचा, भविष्यातील कुरघोड्‌या टाळण्यासाठी भाजपाने केलेली ही मलमपट्टी असल्याची चर्चा देखील आहे.