माझ्या सोबतीला आहेत डोंगर, झाडे, प्राणी-पक्षी, पुस्तके
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-14 14:51:16

स्वत:ची स्पष्ट, रोखठोक मते, अभिनयाची, संवादफेकीची खास शैली, आशयपूर्ण भूमिका यासासाठी नाना पाटेकर ओळखले जातात. पण त्याचबरोबर ते ओळखले जातात ते त्यांच्या पुण्याजवळील खडकवासला येथील फार्म हाउसवर राहून, स्वत: शेती करून स्वीकारलेल्या जीवनशैलीसाठी. नाम फाउंडेशनसाठी नाना पाटेकर ‘कौन बनेगा करोडपती-१६’ मध्ये सहभागी झाले. महानायक अमिताभ यांच्यासमवेत नाना यांनी त्यांच्या गावाकडच्या जीवनाविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अमिताभ बच्चन यांनी ‘आपण गावातच राहायला हवं, असं तुम्हाला कधी वाटलं?’असे विचारले असता, मी गावाकडचा माणूस आहे. मी इकडे काम करतो आणि परत गावी जातो. मी गाव-खेड्यात राहतो आणि तिथेच राहणार, तिकडेच मला बरं वाटते. असे नानांनी सांगितले. ‘‘जर मी चित्रपटात करिअर करू शकलो नसतो, तर मी एक छोटेसे हॉटेल उघडले असते. पण मी जितकी अपेक्षा केली होती, त्यापेक्षा आयुष्याने मला खूप जास्त दिले आहे. माझ्या गरजा अगदी साध्या आहेत. संध्याकाळी माझ्या सोबतीला पुस्तकं असतात. चार-पाच कपाटं भरून पुस्तकं आहेत. शहरात आपल्याकडे भिंती असतात, माझ्या गावात डोंगर आहेत. मी डोंगरांमध्ये राहतो. तिथलं आयुष्य खूप सोपं आहे. तिथे अलार्मसाठी घड्याळ लागत नाही.सकाळी पक्षी मला उठवतात. आमच्याकडे कधीकधी मोरसुद्धा येतात. माझ्याकडे दोन गायी आणि एक बैल आहे. तिथे मीच सगळं काही करतो. नाश्ता, जेवण. माझं सगळे जेवण मीच बनवतो. मी खरोखर चांगले जेवण बनवतो, अशा शब्दात नानांनी त्यांच्या जीवनशैलीविषयी सांगितले. अमिताभदेखील नानांचे बोल ऐकून भारावले, यायला पाहिजे कधीतरी, असे ते म्हणाले.