लतादीदी होत्या सत्यम् शिवम् सुंदरम्ची प्रेरणा
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-14 15:03:37

ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है...जागो, उठकर देखो, जीवनज्योत उजागर है..सत्यम् शिवम् सुंदरम्...हे लतादीदींच्या स्वर्गीय आवाजातील गाणे कानावर पडताच रोमांच उभे राहतात. जगणे, जीवन सुंदर असल्याची अनुभूती येते लतादीदींच्या आर्त स्वरामुळे. राज कपूर यांचा हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. राख होऊन जळत राहणाऱ्या शरीराच्या सौंदर्यापेक्षा मनाची सुंदरता महत्त्वाची, असा सुंदर संदेश राज यांनी या चित्रपटातून दिला होता. मात्र, हा चित्रपट गाजला, तेवढेच याचे किस्सेदेखील. कारण राज कपूर यांना ‘रूपा ’ या मध्यवर्ती भूमिकेची कल्पना लता मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, जीवन प्रवासामुळे मिळाली होती. त्यांना तर रूपाच्या भूमिकेत लतादीदीच चित्रपटात हव्या होत्या. लतादीदींना चित्रपटाची कथादेखील आवडली होती. मात्र, राज यांच्या एका कमेंटमुळे लतादीदी दुखावल्या आणि त्यांनी चित्रपट करण्यास नकार दिला.
झाले असे की, एका मुलाखतीत राज म्हणाले होते, की एका दगडाला जोपर्यंत शेंदूर फासत नाही तोवर तो फक्त दगडच असतो. शेंदूर फासला की लगेचच त्याचा देव होतो. गोष्टींकडे तुम्ही कसे पाहता यावर बरेच अवलंबून असते. तुम्ही एखाद्या मुलीचं सुंदर गाणं ऐकत आहात आणि अचानक तुम्हाला कळतं की ती मुलगी कुरूप आहे. त्या कुरूप मुलीचा तो आवाज आहे. इतकं बोलल्यावर ते थांबले अाणि कुरूप मुलीचा उल्लेख करू नका. लतादीदी नाराज होतील. लतादीदींच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण होते. त्याचे खड्डे होते. पण आवाज स्वर्गीय होता, असे राज कपूर यांना वाटत असे. शेवटी लतादीदींपर्यंत हे प्रकरण पोहोचले. त्या प्रचंड रागावल्या. चित्रपटासाठी गाण्यासही त्यांनी नकार दिला. मात्र, नंतर त्यांनी लतादीदींना गाण्यासाठी तयार केले. दीदीं रेकॉर्डिंग संपले की त्या राज यांच्याशी न बोलता निघून जायच्या. झीनत यांनी नंतर ही भूमिका अजरामर केली.