मैं ना रहूंगा, तुम ना रहोगे...फिर भी रहेंगी निशानियां
शो मॅनची शंभरी : ४० शहरे, १३५ चित्रपटगृहे, १० सर्वोत्तम सिनेमे
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-14 15:07:53

'आग', 'बरसात', 'आवारा', 'श्री ४२०' आणि 'मेरा नाम जोकर', 'प्रेमरोग', 'सत्यम् शिवम् सुंदरम' यांसारख्या अभिजात चित्रपटांचा संपन्न वारसा, कलात्मकसजगता, कलाकृतीवर, संगीतावर जीवापाड प्रेम कसे करावे, याचे अनेक धडे मागे ठेवून गेलेले 'द ग्रेट शो मॅन' राज कपूर यांची १४ डिसेंबरला जन्मशताब्दी साजरी केली जाणार आहे. अत्यंत कलासक्त, कलानिष्ठ आणि जीवनावर, माणसांवर भरभरून प्रेम करणारा माणूस म्हणून राज कपूर यांची ओळख भारतालाच नाही, तर जगभरातील कलारसिकांना आहे. प्रेमसारख्या कोमल भावनेचे अत्यंत संवेदनशील रूप त्यांच्या अनेक चित्रपटांतून दिसते, तर दुसरीकडे बलात्कार, विधवा विवाह यांसारख्या कुप्रथांवर अासूड ओढणाऱ्या, मनाला हेलावून टाकणाऱ्या कथा त्यांच्या चित्रपटात सापडतात. अशा या अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकाराचा शंभरावा वाढदिवस साजरा होणे ही देशासाठी गौरवास्पद बाब आहे.
यानिमित्त राज कपूर यांच्या संपूर्ण परिवाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी रणबीर कूपर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, आलिया भट, सैफ अली खान, करिश्मा कपूर, रीमा कपूर असा परिवार उपस्थित होता. राज कपूर चित्रपट महोत्सवासाठी कपूर परिवाराने पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव देशभरातील ४० शहरांमधील १३५ चित्रपटगृहांत आयोजित केला जाणार आहे. राज कपूर यांचे सर्वोत्तम दहा चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत कपूर परिवाराने विविध विषयांवर चर्चा केली. राज कपूर यांचे देशाच्या, चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मोठे योगदान आहे. तुमच्यासोबत गप्पा मारण्याची संधी मला मिळाली, याचा आनंद असल्याचे सांगून मोदी यांनी राजकीय जगात आपण सॉफ्ट पॉवरबद्दल खूप बोलतो. ज्यावेळी हा शब्दप्रयोग अस्तित्वातही नव्हता, तेव्हा राज कपूर यांनी भारताची सॉफ्ट पॉवर जगभर प्रस्थापित केली. ही त्यांची भारतासाठी मोठी सेवा होती, त्यांच्या चित्रपटांची ही ताकद होती, असे सांगतिले. त्यांच्या एका चीन दौऱ्यात यजमान राज कपूर यांच्या चित्रपटातील गाणी वाजवत होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. 'मी माझ्या टीमला ते मोबाईलवर रेकॉर्ड करायला सांगितले आणि मी ते ऋषीजी (कपूर) यांना पाठवले. ते खूप आनंदी झाले,' असे मोदी म्हणाले. दरम्यान, राज कपूर व त्यांच्या चित्रपटांचा जागतिक प्रभाव व्हिज्युअल फॉरमॅटद्वारे टिपला जावा, असेही पंतप्रधान मोदी यांनी सुचवले. नवीन पिढीने याला जोडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असेही ते म्हणाले.