महायुतीत मलाईदार खात्यांसाठी भांडणे
नाना पटोले यांचा हल्लाबोल
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-14 16:16:15

मुंबई :- महायुती सरकारच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप आज दि.१४ डिसेंबर रोजी होणार अशी चर्चा होती. पण तसे काही झाले नाही. इतकं स्पष्ट बहुमत मिळाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी आटोपला मग मंत्रीमंडळ विस्ताराला होत असलेला विलंब पाहून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या तिघांवरही हल्लाबोल केला आहे महायुतीत मलईदार खात्यांसाठी भांडणं सुरु आहेत. मलईचं खातं कोणाला मिळेल? फक्त यासाठी सरकार काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या घटनेबाबत बोलताना पटोले म्हणाले की, “ संविधान प्रतिकृती विटंबनेच्या घटनेप्रकरणी आम्ही सरकारकडे कारवाईची मागणी केली. मात्र, आज राज्यात तीन जणांचे जे सरकार आहे, सरकारमध्ये मलाईच्या खात्यासाठी भांडणं सुरु आहेत. मलाईचे खाते कोणाला मिळतात? फक्त यासाठी सरकार काम करत आहे. मग या सरकारने प्रशासनाला जे काही आदेश दिले त्या आदेशाच्या जोरावर परभणीत लाठीचार्ज झाला. मग परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले होते? त्यामुळे यावर देखील कारवाई झाली पाहिजे”,
“दिल्लीतील मोदी सरकार ज्या प्रमाणे शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करतं. त्याप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील घडतंय का? तसा संदेश देण्याचा प्रयत्न आहे का? पण आम्ही महाराष्ट्रात हे कदापि होऊ देणार नाही. काँग्रेस महाराष्ट्रात हिटलरशाही चालू देणार नाही”, असा इशाराही नाना पटोले यांनी महायुतीच्या सरकारला दिला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. मात्र निवडणुकीत आलेले अपयश हा आत्मचिंतनाचा भाग आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.