मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात?

शपथविधी कार्यक्रमही रविवारी होणार

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-12-14 16:46:36

मुंबई : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी (दि. १४) होण्याची शक्यता असून, राजभवनात शपथविधीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे समजते. दरम्यान, आता थेट नागपूरलाच महायुती सरकाच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने शनिवारऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते. 
             महायुतीत खातेवाटप व मंत्रिपदाच्या वाटपावरून पेच असून, भाजपला २०, शिवसेना (शिंदे गट) १२ व राष्ट्रवादी काँग्रेसला १०, असे मंत्रिपदाचे सूत्र भाजपने ठरविले आहे. मात्र, सध्या प्रत्येकी आठ-नऊ मंत्र्यांचा शपथविधी करून उर्वरित खाती काही काळ रिक्त ठेवावीत, असा महायुतीच्या नेत्यांचा विचार आहे. शपथविधीसाठी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास तयारी ठेवावी, अशा सूचना प्रशासन यंत्रणेला व राजभवनावर देण्यात आल्याचे समजते. मात्र, शपथविधी कार्यक्रम आणि किती मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे, याबाबतचा तपशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीच्या नेत्यांनी अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेला नाही. मंत्र्यांची संख्या, खातेवाटपावरून भाजप व मित्रपक्षांतील पेच मिटलेला नाही. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्लीहून आल्यावर पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याआधीही बावनकुळे, गिरीश महाजन यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. गृह, नगरविकासह महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार नसल्याने नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी गुरुवारी सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेऊन चर्चा केली. पहिल्या टप्प्यात २५-२८ मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत बुधवारी रात्री भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला. शिंदे गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आदी महत्त्वाच्या खात्यांसाठी अडून बसल्याने भाजपला त्यांची समजूत काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागत आहेत. महायुतीत मंत्रिमंडळावरून कोणताही पेच नसल्याचे फडणवीस व अन्य नेते सांगत असले, तरी त्याबाबत ठोस निर्णय झाला नसल्यानेच शिंदे यांच्याशी भाजपला अनेकदा चर्चा करावी लागत आहे. शिंदे यांनी खातेवाटप व मंत्र्यांची संख्या, नावे याबाबत सहमती दर्शविल्यावरच शनिवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. मात्र, आमदारांच्या सोयीसाठी शपथविधी १५ तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईतील राजभवनाऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून लॉबिंग

राज्य मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात आठ कॅबिनेट, तर दोन राज्यमंत्रिपदे असणार आहेत. त्यासाठी आता नेत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी माजी मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही पवारांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  हेही उपस्थित असल्याचे समजते.

शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले. शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री ः योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर.